याकूब मेमनची दयायाचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सरकारने जाणीवपूर्वक त्याच्या फाशीची तारीख जाहीर केली असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी बुधवारी वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला.
१९९३च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमनला या महिनाअखेर फाशी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी फाशी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अबू आझमी म्हणाले, या आधी अजमल कसाब आणि अफझल गुरू यांनाही फाशी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या फाशीची तारीख सरकारने अगोदरच जाहीर केली नव्हती. फाशी दिल्यावर त्याबद्दल माहिती देण्यात आली. माझ्या माहितीप्रमाणे याकूब मेमनची दया याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मग सरकार त्याला कशी काय फाशी देऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर एका समाजाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक याबाबत माहिती देण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Story img Loader