मुंबई : औरंगजेबाचे उद्दात्तीकरण केल्यावरून अडचणीत आलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे बुधवारी अधिवेशनकाळापर्यंत निलंबन करण्यात आले. संसदीय कार्यमंत्री चंद्रकात पाटील यांनी याबाबत मांडलेला प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला. मात्र आझमी यांचे पाच वर्षांसाठी निलंबन करण्याची मागणी करीत सत्ताधाऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशीही गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे भाष्य केले होते. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी औरंगजेबाचा वाद धार्मिक नव्हता तर राजकीय वैमनस्यातून त्यांची हत्या झाल्याचे वक्तव्य आझमी यांनी केले होते.

आझमी यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनीही तीव्र आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांनी मंगळवारी आझमी यांच्यावर निलंबन आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले होते. त्यानंतर आझमी यांनीही आपले वक्तव्य मागे घेत छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी मागितली. तसेच औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा हेतू नव्हता आणि महापुरुषांचा अवमानही आपण केला नसल्याचा दावा आझमी यांनी केला.

सोलापूरकर, कोरटकर यांच्यावरही कारवाईची मागणी

चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत आझमी यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. त्यावर आझमी यांना केवळ अधिवेशन कालावधीत नव्हे तर संपूर्ण कार्यकालासाठी निलंबित करा किंवा त्यांची आमदारकीच रद्द करा, अशी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका अधिवेशनापेक्षा अधिक काळासाठी निलंबनाची कारवाई करता येत नाही, मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सदस्यांची समिती स्थापन करून निर्णय घेण्याची ग्वाही पाटील यांनी दिली. तर आझमी यांच्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली.

यावेळी सत्ताधारी आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील मोगळ्या जागेत धाव घेत आझमी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मात्र सभागृहात कितीही गोंधळ घातला तरी कामकाज थांबविणार नाही, असे स्पष्ट केले.

आझमींची हकालपट्टी करा, उत्तर प्रदेशात पाठवा : योगी आदित्यनाथ

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पक्षाने औरंगजेबला आपला आदर्श मानल्याचा आरोप करीत ज्यांचे आचरण मुघल शासकांसारखे आहे त्यांनाच त्याचा अभिमान वाटेल, अशी टीका केली. विधानपरिषदेत अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. औरंगजेबचे कौतुक करणारे महाराष्ट्राचे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची तसेच तत्काळ उत्तर प्रदेशला पाठविण्याचे आवाहन करीत त्यांच्यावर उपचार आम्ही करवून घेऊ, असा टोलादेखील योगी आदित्यनाथ यांनी हाणला. ज्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पारंपरिक अभिमान वाटण्याऐवजी लाज वाटते त्या व्यक्तीला भारतात राहण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला. राम, कृष्ण, शिव यांच्या आणि भारतीय परंपरेला शिवीगाळ करणे हेच समाजवादी पक्षाचे उद्दिष्ट असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

पंडित नेहरूंचा निषेध करणार का? – मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. प्रशांत कोरटरकर चिल्लर आहे. पंडित नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह लिखाण केले आहे. मग विरोधक पंडित नेहरूंचा निषेध करणार का, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत करताच गोंधळ झाला. कामकाज बुधवारी सुरू होताच भाई जगताप यांनी औचित्यांचा मुद्दा उपस्थित करून कोरटकर, सोलापूरकरांच्या प्रश्नांवर चर्चेची मागणी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याच विषयावर चर्चेची मागणी केली होती.

विरोधक कोरटकर, सोलापूरकरांवर कारवाईची मागणी करतात. पण, विरोधकांनी छत्रपतींचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा कधी निषेध केला आहे का? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे. विरोधक त्यांचा धिक्कार, निषेध करणार आहात का? – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Story img Loader