मुंबई : मीरा-भाईंदर आणि वसई-विरारमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाह्ण च्या कामाने वेग घेतला आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले असून वसई-विरारसाठीच्या पहिल्या टप्प्याचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्याचे काम ऑक्टोबपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर किंवा डिसेंबरपासून वसई-विरार शहराला १८५ दशलक्ष लिटर इतके मुबलक पाणी उपलब्ध होईल.
एमएमआरडीएने मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांची तहान भागविण्यासाठी १,३२५.७८ कोटी खर्चाच्या या प्रकल्पाच्या कामाला जुलै २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली. मात्र काही कारणांनी प्रकल्प रखडला. मात्र मागील काही महिन्यांपासून प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. या कामाचा नुकताच महानगर आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास यांनी आढावा घेतला. त्यानुसार भविष्यात दोन्ही पालिका क्षेत्रात ४०३ दशलक्ष लिटर क्षमतेने पाणीपुरवठा करणाऱ्या या संपूर्ण प्रकल्पाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील वसई-विरारदरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम ऑक्टोबपर्यंत पूर्ण करत या वर्षांतच वसई-विरारसाठी या प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले.
प्रकल्पाची सद्य:स्थिती
- प्रकल्पामध्ये असणाऱ्या १.७ कि.मी लांबीच्या मेंढवण बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
- कवडास येथील उद्ंचन केंद्राचे बांधकाम सुरू असून आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उद्चंन केंद्राची सर्व काम ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- सूर्या नगर येथील जलशुध्दीकरण केंद्राचे आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्व कामे ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- कवडास उद्ंचन केंद्रापासून ते काशिदकोपर जलकुंभापर्यंत अंथरण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम प्रगती पथावर असून ५७ कि.मी पैकी ५३ कि.मी. काम पूर्ण झाले आहे. उर्वरित जलवाहिनीचे काम ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- तुंगारेश्वर बोगद्याचे काम सुरू असून ४.४ कि.मी. लांबीपैकी ०.९५ कि.मी. लांबीचे काम पूर्ण झाले आहे. बोगद्याचे काम मार्च २०२३ मध्ये पूर्ण करण्यात येईल.