मुंबई : वरिष्ठांचे सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या दिशेने कूच करीत त्यांना शिवी हासडली. यावरून सभागृहात प्रचंड गोंधळ होऊन कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संसदेतील वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्याच्या विधान परिषदेत उमटले. भाजपच्या आमदारांनी राहुल गांधी यांचा निषेध केला. भाजपचे प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव मांडला. त्याला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला. यावरून दानवे आणि लाड यांच्यात खडाजंगी सुरू झाली. लाड हातवारे करीत तावातावाने बोलत होते. त्यावेळी संतापलेल्या दानवे यांनी ‘माझ्याकडे काय बोट दाखवतो’, असे म्हणत आसन सोडले. लाड यांच्या दिशेने जाताना दानवे यांनी एक शिवी दिली. त्यामुळे सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला.

या गदारोळात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले. दानवे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लाड यांनी केली, तर सरकारी कामे बेकायदा स्वत:च्या कंपनीला घेऊन उकळ पांढरे करून घेणाऱ्या लाड यांना बोलण्याचा अधिकार नाही, असे प्रत्युत्तर दानवे यांनी दिले. अनेक सरकारी कामे लाड यांच्या कंपनीला मिळाली आहेत, असाही आरोप केला. तसेच कामे पदरात पाडून घेण्यासाठी लाड हे सत्ता बदलल्यावर पक्ष बदलतात, असा आरोपही दानवे यांनी केला. लाड हे आधी राष्ट्रवादीत होते. भाजपची सत्ता आल्यावर भाजपमध्ये सहभागी झाले.

हेही वाचा >>>मुंबई: अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून अत्याचार,आरोपीला अटक

दानवे यांच्याकडून कृतीचे समर्थन

‘माझा तोल वगैरे काही सुटलेला नाही. माझ्यावर कोणी बोट दाखवले तर ते तोडण्याचा मला अधिकार आहे. मी विरोधी पक्षनेता नंतर त्याअगोदर मी एक शिवसैनिक आहे. कंत्राटे मिळावीत यासाठी सत्ताधारी पक्षाच्या मागे-पुढे फिरणारा लाड हा बाटगा आहे. हा मला काय हिंदुत्व शिकवणार? हे शेपूट घालून पळणारे हिंदुत्ववादी आहेत. हिंदुत्वासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. माझा राजीनामा फक्त पक्षप्रमुख मागू शकतात,’ अशा शब्दांत दानवे यांनी सभागृहात केलेल्या कृतीचे सर्मथन केले.

लाड यांचेही प्रत्युत्तर

लाड यांनीही दानवे यांना प्रत्युत्तर दिले. दानवे यांनी आपल्याला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या आहेत. सभागृहात हिंदूंचा अपमान केला आहे. त्यांच्यापासून आपल्या जिवाला धोका आहे. त्यांनी विरोधी पक्षनेता पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी लाड यांनी केली.