मुंबई : मुंबई विद्यापीठाने सांताक्रुझ येथील कलिना संकुलात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वसतिगृह बांधले आहे. परंतु उद्घाटन होऊन एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही हे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) कलिना संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘एक दिवसीय लाक्षणिक उपोषण’ पुकारले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरातील अभाविपच्या ४० ते ५० विद्यार्थ्यांनी या लाक्षणिक उपोषणात सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा – आजपासून मुंबईत सर्वत्र प्लास्टिक विरोधातील कारवाईला वेग, प्रदूषण नियंत्रण मंडळही कारवाईत सहभागी होणार

अभाविपचे कोकण प्रदेशमंत्री अमित ढोमसे म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह खुले करण्यासाठी अभाविपने वारंवार पाठपुरावा करूनही विद्यापीठ प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्यामुळे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा वसतिगृहात प्रवेश, विद्युत सुविधा, पाण्याची मुबलक व्यवस्था, उपाहारगृहाची व्यवस्था आदी विविध सोयीसुविधांबाबत कालबद्ध कार्यक्रम विद्यापीठाने लिखित स्वरुपात द्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.’

हेही वाचा – उमेदवारी अर्जांच्या छाननीसाठी युवासेनेचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात बांधण्यात आलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे नवीन वसतिगृह हे सहा मजली आहे. १४६ विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या वसतिगृहात वाचन कक्ष, ग्रंथालय आदी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या वसतिगृहाचे उद्घाटन जुलै २०२२ मध्ये तत्कालीन कुलपती व माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु उद्घाटनाच्या एक वर्षानंतरही हे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात न आल्यामुळे अभाविपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.