मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी ‘कॅरी ऑन योजना’ लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापींठाच्या पातळीवर एक समानता ठेवावी, अशी सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच कुलगुरूंना केली होती. मात्र गुणवत्तेसाठी मारक असणाऱ्या कॅरी ऑन योजनेसाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री अनुकूल असणे ही दुर्दैवी बाब असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करीत विरोध केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक नुकतीच चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर काहींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत हजेरी लावली होती. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करताना चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरूंना सांगितले की, ‘काही वेळा शैक्षणिक कारणांमुळे किंवा अन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी येतात. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी कॅरी ऑन योजनेचा उपयोग होतो. मात्र यासंदर्भात सर्व विद्यापींठाच्या पातळीवर एकसमानता असली पाहिजे. यासाठी कालबद्ध नियोजन करावे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी कॅरी ऑन योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या वर्षासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात यावी’.

‘कॅरी ऑन योजना ही विद्यार्थीहिताची नाही. त्यामुळे राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनीच कॅरी ऑन योजनेसाठी अनुकूल असणे दुर्दैवी आहे. शिक्षणक्षेत्रात अशी सकारात्मकता दाखवणे म्हणजे विद्यार्थांची खरतर दिशाभूल करणे होय’, असे ‘अभाविप’चे कोकण प्रदेश मंत्री राहुल राजोरिआ यांनी सांगितले.

‘कॅरी ऑन’ योजना म्हणजे नेमके काय?

अभियांत्रिकी विद्याशाखेतील प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राकरिता किंवा द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्रासाठी ‘कॅरी ऑन’ अंतर्गत विशेष संधी नसल्यामुळे प्रवेश घेता येत नाही. गेल्या वर्षी अभियांत्रिकीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’ची मुभा देण्यात आली होती. मात्र यंदा या निर्णयाची पुनरावृत्ती करण्यात आली नाही. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आहे आणि विद्यार्थी मानसिक तणावाखाली असल्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’ योजनेच्या माध्यमातून पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी काही विद्यार्थी संघटनांनी संबंधित विद्यापीठांच्या कुलगुरुंकडे केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ‘कॅरी ऑन’ योजनेसंदर्भात कुलगुरूंना सूचना करताना सकारात्मक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. मात्र विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अधिकची संधी देणे चूक नाही. परंतु हा निर्णय घेत असताना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाशी तडजोड होता कामा नये, असा मुद्दा उपस्थित करीत ‘अभाविप’ने चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेला तीव्र विरोध केला.