गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान कोकण मार्गावर प्रीमियम दरात वातानुकूलित डबलडेकर गाडी चालवण्याचा मध्य रेल्वेचा प्रयोग फसल्यापासून दिवाळीचा अपवाद वगळता ही गाडी सर्वसामान्य प्रवाशांच्या नजरेलाही पडलेली नाही. असे असताना आता या मार्गावर वातानुकूलित डबलडेकर सेवा चालवण्यासाठी मध्य रेल्वेने दक्षिण मध्य रेल्वेकडील एका डबलडेकर गाडीची मागणी केली आहे. मध्य रेल्वेकडे असलेल्या डबलडेकरच्या नऊ डब्यांपैकी दोन डबे इतरत्र देण्यात आले असून, एक डबा खराब झाल्याने हा उपाय केल्याचे सांगण्यात येत आहे. गणेशोत्सवात ही गाडी चालवण्यासाठीचे सर्व नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. मात्र ही गाडी ताब्यात आल्याशिवाय काहीच शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मध्य रेल्वेने कोकण मार्गावर वातानुकूलित डबलडेकर चालवताना प्रीमियम दरात चालवली होती. त्यामुळे या गाडीला ऐन गणेशोत्सवातही अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर कोकणात कमी गर्दीचा हंगाम असलेल्या दिवाळीत ही गाडी चालवत मध्य रेल्वेने आपल्या नियोजनशून्यतेचा नमुना सादर केला. त्यानंतर ही गाडी देखभाल-दुरुस्तीसाठी म्हणून कारखान्यात गेली, त्यानंतर तिचे दर्शन अद्यापही प्रवाशांना झालेले नाही. मध्यंतरी ही गाडी दुसऱ्या विभागाकडे सोपवण्यात येत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र मध्य रेल्वेने त्याचे खंडन केले होते.
दरम्यान, नऊ डब्यांच्या या गाडीचे दोन डबे मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेवरील ‘मुंबई-अहमदाबाद’ या गाडीसाठी दिले आहेत. तर या गाडीचा एक डबा खराब अवस्थेत आहे. परिणामी ही गाडी सहा डब्यांसह चालवणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेच्या गाडी व डबे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मात्र कोकण मार्गावर डबलडेकर गाडी चालवण्यासाठी मध्य रेल्वेने दक्षिण मध्य रेल्वेकडील एक डबलडेकर गाडी आपल्याला मिळावी, अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे.
सामान्य दरातच धावणार
दक्षिण मध्य विभागात धावणाऱ्या या गाडीला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद आहे. त्यामुळे दक्षिण मध्य विभागाने ही गाडी रेल्वे बोर्डाकडे परत दिली आहे. ही गाडी चालवण्यात कोणाला रस असल्यास तशी मागणी करावी, असे रेल्वे मंत्रालयाने सुचवले होते. त्यानुसार मध्य रेल्वेने हे मागणीपत्र रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्ड यांच्याकडे धाडले आहे. या मागणीपत्रावर अद्याप निर्णय झालेला नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र गणेशोत्सवात ही गाडी चालवण्याच्या दृष्टीने आम्ही वेळापत्रक तयार केले आहे. ही गाडी ताब्यात आल्यास ती तातडीने कोकणासाठी चालवण्यात येईल. तसेच यंदा ही गाडी सामान्य दरातच धावेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा