विद्युत यंत्रणेसाठीचा भाग आल्यानंतर आठवडाभरात जागच्या जागी चाचण्या

देशात सत्ता आल्यानंतर ‘मेक इन इंडिया’ची हाक देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाच संदेश ठळकपणे पोहोचवणारी भारतीय बनावटीची वातानुकुलित लोकल चाचणीसाठी उतरवण्यातही पाच महिन्यांपासून रेल्वेला अपयश येत आहे. ‘बीएचईएल’ (भेल) या कंपनीची विद्युत यंत्रणा असलेल्या या लोकलच्या बनावटीचा खर्च परदेशी बनावटीच्या लोकल गाडय़ांपेक्षा निम्म्याने कमी असल्याचे सांगण्यात येत होते. या लोकलच्या विद्युत यंत्रणेतील इंडक्टर हा भाग आवश्यक असून तो येत्या आठवडय़ात मुंबईत येणार आहे. त्यानंतरच्या आठवडय़ात कारशेडमध्ये जागच्या जागी या लोकलच्या चाचण्या सुरू होतील, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

चेन्नईच्या इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) या लोकलची बांधणी झाली असून या लोकलची विद्युत यंत्रणा ‘भेल’ची आहे. पंतप्रधानांचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न साकारणारी ही गाडी असल्याचा गवगवाही रेल्वेने केला होता. सुरुवातीला ही गाडी पश्चिम रेल्वेवर चालवण्यात येणार होती. त्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलेल्या घोषणेनुसार ती मध्य रेल्वेवर चालवण्याचे ठरले आणि ५ एप्रिल रोजी ही गाडी कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. गाडीची विद्युत यंत्रणा चालू करून काही प्राथमिक कामे केल्यानंतर या गाडीची चाचणी मे महिन्यात घेतली जाईल, असे मध्य रेल्वेचे तत्कालिन महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले होते.

लवकरच या गाडीच्या विद्युत यंत्रणेत काही समस्या उद्भवल्याचे सांगत ही चाचणी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर या गाडीची उंची जास्त असल्याने ती सीएसटी-कल्याण या दरम्यान चालवणे कठीण असल्याचे सांगत चाचणीसाठी ही गाडी पश्चिम रेल्वेकडे सोपवण्याच्या हालचालीही सुरू होत्या. याच दरम्यान जून महिन्याच्या अखेरीस या गाडीतील विद्युत यंत्रणेसाठी इंडक्टर हा भाग आवश्यक असल्याचे ‘भेल’च्या अधिकाऱ्यांना लक्षात आले. या भागाची मागणी अधिकाऱ्यांनी नोंदवली असून हा भाग येत्या आठवडय़ात कुर्ला कारशेडमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आता हे भाग आल्यानंतर त्यांची जोडणी करण्यात येईल. त्यानंतर पुढील आठवडय़ात कुर्ला कारशेडमध्ये जागच्या जागी या लोकलच्या चाचण्या घेतल्या जातील. यात वातानुकुलन व्यवस्था, विद्युत यंत्रणा, स्वयंचलित दरवाजे यांच्या चाचण्या प्रामुख्याने होतील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Story img Loader