मुंबई : मध्य रेल्वेला प्रवाशांच्या रोषामुळे वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. मात्र असे असले तरीही पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. वातानुकूलित फेऱ्यांमध्ये १ ऑक्टोबरपासून वाढ़ झाली असून दैनंदिन तिकीट विक्रीतही वाढ़ झाली आहे. एकाच दिवसांत १८ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. सप्टेंबररच्या तुलनेत दैनंदिन तिकीट विक्रीत वाढ़ झाली आहे.

हेही वाचा >>>Split AC देतो सांगून हॉटेल मालकाने भिंतीत भगदाड पाडून दिला ‘दोघांत एक’ एसी; मुंबईमधील फोटो ठरतोय ‘राष्ट्रीय चर्चेचा विषय’

पश्चिम रेल्वेने १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला होता. पश्चिम रेल्वेने प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन नव्या वेळापत्रकात आणखी ३१ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामान्य लोकलच्या ३१ फेऱ्यांच्या बदल्यात वातानुकूलित लोकल चालवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल अशी शंकेची पाल चुकचुकत होती. मात्र  प्रवाशांचा प्रतिसाद काहीसा वाढला आहे. सध्या दररोज ७९ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत आहेत. वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढल्याने तिकीट विक्रीतही वाढ झाली आहे.१ सप्टेंबर रोजी १२ हजार ६६३, तर ३ सप्टेंबर रोजी १५ हजार ७८९ तिकीट विक्री झाली होती. तर याच महिन्यात साधारण एक ते दोन हजार पासची विक्री झाली होती. 

हेही वाचा >>>चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

ऑक्टोबरमध्ये यात वाढ झाली असून २ ऑक्टोबर रोजी सर्वाधिक १८ हजार ६५८ तिकिटांची विक्री झाली आहे. १० आणि ११ ऑक्टोबर रोजी प्रत्येकी १७ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल डिसेंबर २०१७ मध्ये धावली. सुरुवातीला या लोकल सेवांना अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र तिकीट दरात कपात होताच प्रतिसाद वाढू लागला. सध्या पश्चिम रेल्वेकडे सहा वातानुकूलित लोकल असून लोकलच्या आतील उपकरणांची डब्याखाली व्यवस्था करण्यात आली असून नव्या रचनेची आणखी एक वातानुकूलित लोकल लवकरच सेवेत येणार आहे. या लोकलची गेल्या अनेक महिन्यांपासून चाचणी सुरू होती. आता नव्या वेळापत्रकात या लोकलचे नियोजन करण्यात येत आहे.

Story img Loader