कल्याण ते ठाणे आणि कल्याण ते लोकमान्य टिळक टर्मिनसमधील पाचव्या आणि सहाव्या मार्गावर विद्युतीकरणातील बदल लवकरच लागू होणार आहेत. पुढील आठवड्यात रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून याची पाहणी झाल्यानंतर अल्टरनेट करंट (ए.सी.) ताबडतोब लागू होणार असल्याचे रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले.  
विद्युतीकरणातील बदलामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्यासाठी इगतपुरी रेल्वे स्थानकावर असणा-या लोकोमोटीवमध्ये बदल करावा लागणार आहे. मध्य रेल्वेला यामुळे उपनगरामध्ये वीज वाचवण्यास मदत होईल.  
याचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वेला ब्लॉक प्रमाणे वेळापत्रक तयार करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, संबंधीत कागदपत्रांची छाननी करून त्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असल्यास ते करण्यात येईल, असं मध्य विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी म्हणाले.   
याबाबतचा पहिला आढावा १२ जून रोजी घेण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना सांगितले. चार वेळा आढावा घेतल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम निर्णय दिला जाईल असंही ते म्हणाले. याआधी १८ मे रोजी आढावा घेण्यात येणार होता.
१५०० वोल्ट डायरेक्ट करंट (डि.सी) ते २५००० वोल्ट अल्टरनेट करंट (ए.सी.) चे काम मे महिन्याच्या सुरूवातीलाच पूर्ण झाले होते, परंतू कागदपत्रांची पडताळणी करण्यात वेळ जात असल्याने ही सेवा सुरू करण्यास उशीर होत आहे.