आपले वडील दादासाहेब रेगे यांच्यावर बापूसाहेबांनी ‘किमयागार दादा’ हे पुस्तक लिहिले. तर बालमोहनची ६० वर्षांची वाट उलगडूल सांगणारे ‘बालमोहन काल आज आणि उद्या’ या पुस्तकाचेही लेखन त्यांनी केले आहे. या शिवाय ‘आठवणीतली पावले’ हे त्यांचे आत्मवृत्तही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी विविध नियतकालिके वृत्तपत्रांमधून शैक्षणिक मार्गदर्शन केले आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे व्याकरण सोपे व्हावे यासाठी त्यांनी इंग्रजी व्याकरण पुस्तिकाही लिहिल्या. त्यांना मुंबई वृत्तपत्र लेखक संघातर्फे आणि दादरकरांतर्फे समाजभूषण पुरस्कार, विद्यामहर्षी पुरस्कार आदीं पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या कारकिर्दीतच बालमोहन विद्यामंदिर संस्थेला शासनाचा उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल राज्य शासनाचा एक लाख रुपये रकमेचा पुरस्कारही मिळाला होता. बापूंच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.