मुंबई : दोन कोटींची लाच मागितल्याच्या आरोपाखाली महापालिकेचे पदनिर्देशित अधिकारी मंदार तारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरूवारी अटक केली. याप्रकरणी ७ ऑगस्टला गुन्हा दाखल करून दोघांना एसीबीने अटक केली होती. दोघांना त्यावेळी ७५ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. मंदार अशोक तारी अंधेरी पूर्व येथे पालिकेच्या के ईस्ट वार्ड येथे पदनिर्देशिक अधिकारी म्हणून कार्यरत होते.
त्याच्यावतीने तक्रारदाराकडून ७५ लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली दोघांना ७ ऑगस्टला अटक करण्यात आले होते. तक्रारदार विकासकाने चार मजली इमारतीत दोन बेकायदेशीर मजले उभारले होते. त्यासाठी तारी यांनी २ कोटींची लाच मागितली होती, असा आरोप आहे. त्या बदल्यात बेकायदेशीर मजल्यांवर कारवाई न करण्याचे व भविष्यात भूखंडावर बेकायदेशीर बांधकाम संरक्षित करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे विकासकाने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली. त्यावेळी सापळा रचून दोघांना अटक करण्यात आले होते. तारी यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो रद्द झाल्यामुळे गुरूवारी एसीबीने तारी यांना अटक केली.