‘एसआरए’तील भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल असताना प्रकाश मेहतांकडे त्याच खात्याची जबाबदारी
झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत (एसआरए) भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला असतानाही प्रकाश मेहता यांच्याकडे गृहनिर्माणमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आल्याने मेहता संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती उघड झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ज्या मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत त्यांच्याबाबतचा तपशील माहिती अधिकार कायद्याखाली अंकुर पाटील यांनी मागितला होता. त्यानुसार २२ जानेवारी २०१६ रोजी एसीबीने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचारप्रकरणी प्रकाश मेहता व अन्य तीन नगरसेवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तसेच न्यायालयीन आदेशाची प्रत अर्जदारास देण्यात आली. विशेष म्हणजे प्रकाश मेहता यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अनुच्छेद १५६ खाली आपली चौकशी सुरू असल्याचे नमूद केले आहे. शपथपत्रातील चौकशीबाबतचा उल्लेख आणि एसीबीने २२ जानेवारी २०१६ रोजी दिलेल्या माहितीनुसार मेहता यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याबाबतची ‘जैसे थे’ स्थिती आहे. त्या गुन्ह्यातून ते आरोपमुक्त झालेले नाहीत. तरीही ज्या खात्याच्या अखत्यारीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना येते, त्या योजनेतील भ्रष्टाचाराबद्दल गुन्हा दाखल असताना त्याच गृहनिर्माण खात्याची जबाबदारी कॅबिनेट मंत्री म्हणून प्रकाश मेहता यांना देण्यात आली आहे.
माहिती अधिकारातून उपलब्ध कागदपत्रांनुसार..
- भाजपचे कार्यकर्ते शिवशंकर जोशी यांनी मेहता व अन्य तिघा जणांनी घाटकोपर (पूर्व), गौरीशंकरवाडी येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेखाली बांधण्यात आलेल्या २२ मजली इमारतींमध्ये सदनिका घेऊन नंतर त्या विकून त्यातून कोटय़वधी रुपये मिळविल्याचा आरोप केला.
- या संदर्भात जोशी यांनी २००७ मध्ये विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
- त्यानुसार न्यायालयाने ६ डिसेंबर २००७ रोजी या प्रकरणाचा तपास करून ९० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश एसीबीला दिले.
- न्यायालयाच्या आदेशानुसार एसीबीने १० मार्च २००८ रोजी प्रकाश मेहता व अन्य तिघा जणांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला.
- २२ जानेवारी २०१६ पर्यंतच्या स्थितीची एसीबीकडून ही माहिती देण्यात आली आहे.
माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. विचित्र मानसिकतेतून हे आरोप करण्यात आले आहेत. शिवशंकर जोशी हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. १९८५ मध्ये त्यांचा निवडणुकीत पराभव झाला, त्याचा त्यांनी माझ्यावर राग काढला. त्यानुसार त्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तेच ते आरोप जोशी सातत्याने करीत आहेत. त्यात तथ्य नाही.
– प्रकाश मेहता, गृहनिर्माणमंत्री
न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित प्रकरणात मेहता व अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन आरोपी गुन्हा दाखल केल्याविरोधात न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे सध्या तरी या प्रकरणात कोणतीही कारवाई सुरू नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक सतीश माथुर यांनी स्पष्ट केले.