राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने तब्बल तीन तास चौकशी केली.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील घोटाळा, भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासहित त्यांच्या कुटुंबावर आरोप करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या लाचलुचपत खात्याने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दुसरा अंतरिम अहवाल सादर केला होता. पंकज आणि समीर भुजबळ संचालक असलेल्या परवेश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बँक खात्यात मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर रकमा जमा झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. ही बाब गुन्हा नोंदवण्यास पुरेशी असल्याचे न्यायालयाने सांगितले होते; परंतु गुन्हा दाखल करण्यास अजून चौकशीसाठी वेळ मागून घेण्यात आला होता. त्यांना न्यायालयाने मुदतवाढ दिली होती. त्यामुळेच लगेचच गुरुवारी छगन भुजबळ यांना चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याच्या वरळी येथील कार्यालयात पाचारण करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याच्या विशेष तपास पथकाने तब्बल तीन तास भुजबळ यांची चौकशी केली. यापूर्वी पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली होती. आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांनी भुजबळ कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ही जनहित याचिका दाखल केली होती.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भुजबळ यांची चौकशी
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने तब्बल तीन तास चौकशी केली.

First published on: 01-05-2015 at 04:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acb probes chhagan bhujbal for three hours