नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सकाळी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई, नाशिक, मनमाड, येवला आणि पुणे येथील विविध घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. गेल्याच आठवड्यात याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छगन भुजबळ यांच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱयांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले होते.
नाशिकमधील भुजबळ फार्म येथील छगन भुजबळ यांचे निवासस्थान तसेच कार्यालय तसेच येवला आणि मनमाडमधील निवासस्थान आणि कार्यालय या ठिकाणी मंगळवारी सकाळी छापे टाकण्यात आले. त्याचवेळी मुंबईतील वरळी, माझगाव, चर्चगेट, सांताक्रुझ, दादर, शिवाजी पार्क येथेही त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबईतील अधिकाऱयांनी हे छापे टाकले. एकूण २५ हून जास्त अधिकारी या छापेसत्रात सहभागी झाले आहेत. दुपारपर्यंत छापे घातलेल्या ठिकाणी शोधकार्य सुरूच होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या ठिकाणी टाकले छापे…
महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीमार्फत चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र सदन प्रकरणात घोटाळा झाल्याचे नमूद करून छगन भुजबळांसह पंकज व समीर भुजबळ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) अरुण देवधर, दीपक देशपांडे, मुख्य अभियंता माणिक शहा, मुख्य वास्तुशास्रज्ञ बिपिन संख्ये, कार्यकारी अभियंता अनिलकुमार गायकवाड या अधिकाऱ्यांसह मे. चमणकर इंटरप्राईझेसचे कृष्णा चमणकर, प्रसन्न चमणकर, प्रवीणा चमणकर, प्रणिता चमणकर तसेच भुजबळपुत्रांच्या कंपनीशी संबंधित कर्मचारी तन्वीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुजबळांची मालमत्ता २६५३ कोटींची?
दोनच दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहिती आय़ुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव दीपक देशपांडे यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यांच्या घरी तब्बल १.५३ किलो सोने, २७ किलो चांदी आणि २ कोटी ६८ लाख रुपयांचे बाँड्स आणि ठेवी आढळून आल्या आहेत.

Story img Loader