अधिकारी पथकाकडून रोकड मोजण्याचे काम सुरू, सक्तवसुली संचालनालयातील सूत्रांचा दुजोरा
भुजबळ कुटुंबीयांच्या विविध कंपन्यांच्या कार्यालयांवर टाकण्यात आलेल्या छाप्यातून मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. सध्या त्याची मोजदाद करण्याचे काम सुरू आहे. या छाप्यातून बरीच मोठी रोख रक्कम मिळाल्याच्या वृत्ताला सक्तवसुली संचालनालयातील सूत्रांनीही दुजोरा दिला आहे.
‘महाराष्ट्र सदन’ व इतर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने काळ्या पैशाविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, तसेच पंकज आणि समीर भुजबळ हे संचालक असलेल्या विविध कंपन्यांच्या कार्यालयांवर सोमवारी छापे टाकले होते. तब्बल २० अधिकाऱ्यांच्या पथकाने नऊ ठिकाणी हे छापे टाकले.
‘महाराष्ट्र सदन’ गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले समीर भुजबळ यांना ८ फेब्रुवारीपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनाविण्यात आली आहे. सोमवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाकडून नऊ तासांच्या चौकशीत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात समीर भुजबळ अपयशी ठरल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.
वकिलांचा इन्कार
दरम्यान भुजबळ यांचे वकील सेजल यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र छाप्यातून रोख रक्कम मिळाली असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.