मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी, तसेच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक सुविधा विकसित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणत आहे. येत्या दोन – तीन वर्षांत मेट्रोच्या अनेक मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत. पश्चिम आणि पूर्व उपनगरे तसेच मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गिकांमुळे प्रवास अतिजलद आणि सुकर होणार आहे. एमएमआरडीएने मेट्रो प्रकल्पाला प्राधान्य दिले असून सध्या कामे सुरू असलेल्या मार्गिकांचे प्रकल्प पुढील दोन – तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले आहे. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकांच्या कामाला वेग देण्यात आला आहे.
मुंबई आणि एमएमआरमध्ये ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणले जात असून यात १४ मेट्रो मार्गिकांचा समावेश आहे. यातील पहिली अंदाजे ११ किमी लांबीची वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो मार्गिका २०१४ मध्येच पूर्ण झाली असून या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच वेळी ‘मेट्रो २’मधील ‘२ अ’चा पहिला दहिसर – आरे टप्पा सुरू झाला आहे. तर आरे – डी. एन. नगर या दुसऱ्या टप्प्याचे कामही पूर्ण झाले असून महिन्याभरात हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. ‘मेट्रो २ अ’चा विस्तार ‘मेट्रो २ ब’च्या माध्यमातून डी. एन. नगर – मंडाले असा होणार आहे. ही २३.६४ किमी लांबीची ‘मेट्रो २ ब’ मार्गिका असून या मार्गिकेचे आतापर्यंत २९ टक्के काम (स्थापत्य काम) पूर्ण झाले आहे. ही मार्गिका जून २०२५ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. ‘मेट्रो २’ नंतर एमएमआरडीएच्या दृष्टीने मुंबई आणि ठाण्याला जोडणारी ‘मेट्रो ४’ मार्गिका महत्त्वाकांक्षी मानली जात आहे. वडाळ – घाटकोपर ते कासारवडवली अशी ‘मेट्रो ४’ मार्गिका असून पुढे ‘मेट्रो ४’ मार्गिकेचा कासारवडवली – गायमुख (मेट्रो ४ अ मार्गिका) असा विस्तार करण्यात येत आहे. आतापर्यंत ‘मेट्रो ४’ची ४१.४३ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. तर ‘मेट्रो ४ अ’चे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकाही २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होतील अशी शक्यता आहे.
‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’चे दोन टप्प्यांत काम करण्यात येणार असून यापैकी ठाणे – भिवंडी टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत या टप्प्याचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. नव्या वर्षांत दुसऱ्या टप्प्यातील भिवंडी – कल्याण दरम्यानच्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम २०२५ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. ‘मेट्रो ५’नंतर मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी मार्गिका म्हणजे ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिका. या मार्गिकेचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. आतापर्यंत या मार्गिकेचे ६३ टक्के काम पूर्ण झाले असून ही मार्गिका लवकरात लवकर वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. मात्र या मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न अद्याप निकाली लागलेला नाही. कांजूरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित असून या जागेचा वाद अजूनही संपलेला नाही. कारशेडसाठी जागा मिळालेली नाही. कारशेडसाठी इतर पर्यायांचीही चाचपणी सुरू आहे. जोपर्यंत कारशेड होत नाही तोपर्यंत ही मार्गिका पूर्ण होणे शक्य नाही.
मेट्रो १३ आणि १४ला भविष्यात सुरुवात
‘मेट्रो ७’चा डहाणूकरवाडी – आरे पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये सेवेत दाखल झाला असून दुसरा आरे – अंधेरी टप्पा पूर्ण झाला आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांत हा टप्पा कार्यान्वित होईल. मुंबई आणि मीरारोड-भाईंदरला जोडणारी मेट्रो ९ मार्गिकाही अत्यंत महत्त्वाची असून या प्रकल्पाचेही काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत या मार्गिकेचे ४७ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र या मार्गिकेतही कारशेडचा मुद्दा वादग्रस्त असून तो सुटल्याशिवाय ही मार्गिका मार्गी लागणार आहे. एमएमआरडीएने हाती घेतलेल्या मेट्रोच्या कामांनी २०२२ मध्ये वेग घेतला आहे. तर आता नव्या वर्षांत २०२३ मध्ये एमएमआरडीए मेट्रो १० (गायमूख ते मीरोरोड) आणि मेट्रो १२ ( कल्याण-डोंबिवली-तळोजा) या नव्या दोन मेट्रो मार्गिकेच्या कामाला सुरुवात करणार आहे. तर मेट्रो ११ (वडाळा ते सीएसएमटी) या मार्गिकेसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून पुढे मेट्रो १३ (शिवाजी चौक, मीरारोड ते विरार) आणि १४ (अंबरनाथ-बदलापूर)च्या कामालाही भविष्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे.