मुंबई…वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेचा कामादरम्यान शुक्रावारी, ४ एप्रिलला एक दुर्घटना घडली. गरोडीया नगर मेट्रो स्थानकाखालून जाणाऱ्या एका चारचाकीवर वरुन एक लाकडी दांडा पडला. हा दांडा चारचाकीच्या समोरील काच फोडून थेट आत गेला. त्यात वाहनाचे नुकसान झाले, मात्र यात कोणालाही कसली दुखापत झाली नाही. याप्रकरणाची गंभीर दखल घेत याप्रकरणी अखेर मंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंत्राटदारास आर्थिक दंड ठोठावला आहे. तर वाहन मालकास योग्य ती नुकसान भरपाईही देण्यात आली आहे.

योग्य ती खबरदारी घेण्याचे कंत्राटदाराला निर्देश

एमएमआरडीएकडून मेट्रो ४ मार्गिकेचे काम सुरु आहे. या मार्गिकेतील उन्नत गरोडीया नगर मेट्रो स्थानकाची काही कामे सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता या कामादरम्यान वरुन एक लाकडी दांडा खालून जाणार्या एका खासगी चारचाकीवर पडला. हा दांडा थेट चारचाकीच्या समोरील काच भेदून आत गेला. वाहनचालक यात थोडक्यात बचावला. वाहनचालक वा इतर कोणालाही दुखापत झाली नाही.

मात्र चारचाकीचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर कंत्राटदार टाटा प्रोजेक्टस लिमिटेड या कंत्राटदार कंपनीने वाहनचालकाला योग्य ती नुकसान भरपाई दिली. पण अशी काही घटना घडल्याची माहिती एमएमआरडीएला नव्हती. रविवारी या अपघाताचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर याबाबतची माहिती एमएमआरडीएला मिळाली. त्यानंतर एमएमआरडीएच्या संबंधित अधिकार्यांनी याची गंभीर दखल घेत कंत्राटदाराला सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करण्याची सूचना केली. यापुढे अशी घटना घडणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचेही निर्देश दिले.

कामादरम्यान योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देतानाच एमएमआरडीएने करारातील नियमानुसार कंत्राटदारास रविवारी आर्थिक दंड ठोठावल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. तर डीबी इंजिनियरींग, हिल इंटरनॅशनल आणि लुईस बर्ज या तीन प्रकल्प सल्लागार कंपन्यांच्या माध्यमातून या दुर्घटनेच्या चौकशी करण्याचा निर्णय घेत तसे निर्देश या कंपन्यांना दिले आहेत. सल्लागार कंपन्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई वा सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असेही एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान कंत्राटदाराला ठोठावण्यात आलेल्या दंडाची तसेच वाहन मालकाला देण्यात आलेल्या नुकसान भरपाईची रक्कम समजू शकली नाही.