लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : मोटरगाडी चालविण्यास शिकत असताना वृद्ध महिलेला दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला. या अपघातात तिघे जखमी झाले असून आरोपी चालक विनापरवाना मोटरगाडी चालविण्यास शिकत होता. याप्रकरणी मोटार चालविण्यास शिकविणारा आणि शिकणाऱ्या अशा दोघांनाही कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरोधात निष्काळजीपणाने मोटर चालवून महिलेच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
कांदिवली परिसरात वास्तव्यास असलेला टॅक्सीचालक राजेंद्र गुप्ता मित्र सुरेंद्र गुप्ताला शुक्रवारी सकाळी मोटार चालविण्यासाठी शिकवत होता. कांदिवलीमधील पोयसर गांवदेवी रस्ता आणि एस. व्ही रोड दरम्यानच्या परिसरात सुरेंद्र मोटार चालविण्यास शिकत होता. राजेंद्र त्याच्या बाजूला बसून त्याला मार्गदर्शन करीत होता. सुरेंद्रकडे मोटरगाडी चालविण्याचा परवाना नव्हता. मात्र तरीही तो विनापरवाना मोटर चालवत होता. माय फेअर ग्रीन सोसायटीजवळ शुक्रवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास सुरेंद्रने ब्रेकऐवजी जोरात एक्सलेटर दाबला. त्यामुळे मोटर वेगात पुढे गेली आणि मोटरीने रस्त्यावरून जाणार्या एका वृद्ध महिलेसह तिघांना धडक दिली. या अपघातात ते तिघेही जखमी झाले.
आणखी वाचा-Monsoon Update Mumbai : मुंबईत पावसाचा जोर वाढला
अपघाताची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी झालेल्या तिघांनाही कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर वृद्ध महिलेला मृत घोषित करण्यात आले, तर इतर दोघांवर प्राथमिक औषधोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. याप्रकरणी प्रवासकुमार महेश्वर बरल या जखमी पादचार्याच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी सुरेंद्र रमेश गुप्ता आणि राजेंद्र चिरकुड गुप्ता या दोघांविरुद्ध हलगर्जीपणाने मोटर चालवून एका वृद्ध महिलेच्या मृत्युस, तर इतर दोघांना जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा या दोघांनाही अटक केली.