कळवा येथील सह्य़ाद्री सोसायटी भागात इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत पावलेल्या सई निकते या महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा उलगडा करण्यात कळवा पोलिसांना यश आले असून मावळता सूर्य पाहण्यासाठी दुसऱ्या इमारतीतील पाण्याच्या टाकीवर जात असताना पत्र्याच्या शेडवरून दोघे तोल जाऊन खाली पडल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
स्वप्नील निकते आणि त्यांची पत्नी सई हे दोघे रविवारी सायंकाळी इमारतीच्या गच्चीवर गेले होते. काही वेळानंतर ते गच्चीवरून खाली पडले. त्यात सई हिचा मृत्यू तर स्वप्नील हे जखमी झाले होते. या घटनेनंतर हा अपघात की आत्महत्या, अशा चर्चेला शहरात उधाण आले होते. याच दिशेने कळवा पोलिसांनीही तपास सुरू केला होता. तसेच स्वप्नील बेशुद्ध अवस्थेत असल्याने या घटनेबाबत पोलिसांना सविस्तर माहिती मिळू शकली नव्हती.  दरम्यान, मंगळवारी स्वप्नील शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची सविस्तर माहिती दिली असून त्यामध्ये दोघेही इमारतीच्या गच्चीवरील पत्र्यावरून तोल जाऊन पडल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश निलेवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इमारतीच्या गच्चीवर असलेल्या पाण्याच्या टाकीवरून मावळता सुर्य दिसत नसल्याने निकते दाम्पत्य पत्र्याच्या शेडवरून बाजूला असलेल्या दुसऱ्या इमारतीतील पाण्याच्या टाकीवर जात होते. त्यावेळी पत्र्याच्या शेडवरून दोघे तोल जाऊन खाली पडल्याने हा अपघात घडल्याचे त्यांनी सांगितले.        

Story img Loader