मुंबईच्या वांद्रे-वरळी सागरी सेतूवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. यामध्ये अपघाताचा पंचनामा करणाऱ्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. काल मध्यरात्री सी लिंकवरून भरधाव वेगात जात असलेल्या सुमो गाडीने आय-२० कारला जोरदार धडक दिली. सुमोच्या चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा प्रकार घडला. सुमोची धडक बसल्यानंतर आय-२० कार दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात सुमो गाडीतील एकाचा मृत्यू झाला आहे, तर गाडीतील अन्य सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आय-२० कारमधील एक पुरुष आणि दोन महिला सुरक्षित आहेत. दरम्यान, या अपघाताचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी आलेल्या वाहतूक पोलिसालाही मार्गावरून जाणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. त्यामुळे या वाहतूक पोलिसालाही रूग्णालयात दाखल करावे लागले आहे.
वांद्रे-वरळी सी लिंकवर सुमोची कारला जोरदार धडक; एकाचा मृत्यू
सुमोच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा प्रकार घडला.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 18-04-2016 at 09:17 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident on bandra worli sea link