मुंबई : मुंबईहून दुबईला जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला इमिग्रेशन विभागाने मुंबई विमानतळावर ताब्यात घेऊन महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय) विभागाच्या ताब्यात दिले. आरोपीने रात्रीचा फायदा घेत अधिकाऱ्यांची नजर चुकवून कागदपत्रांसह पळ काढल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. मेहुल अशोक कुमार जैन (२७) असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> मुलुंडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी,एकजण गंभीर
अहमदाबाद डीआरआयचे इंटेलिजन्स ऑफिसर राकेश ओमप्रकाश रंजन (३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळचा अहमदाबाद येथील रहिवासी असलेला मेहुल अशोक कुमार जैन (२७) याला सीमाशुल्क कायदा १९६२ कलम १३५ या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्या विरुद्ध १६ जून रोजी लुक आऊट सर्कुलर (एल.ओ.सी.) जारी करण्यात आले होते.
हेही वाचा >>> मुंबईकरांची पाणी चिंता मिटली; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ९९.३३ टक्के पाणीसाठा
मुंबईहून दुबईला जाण्यासाठी तो २७ सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळावर आला. त्याच वेळी इमिग्रेशन विभागाने त्याला ताब्यात घेतले. याबाबत डी.आर.आयला कळवताच पथकाने आरोपीला चर्चगेट येथील कार्यालयात आणले. ट्रान्झिट रिमांडसाठी जैनला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करून अहमदाबाद येथे नेण्यात येणार होते. मात्र, त्याने रात्री दोन ते अडीचच्या सुमारास अधिकाऱ्यांची नजर चुकवून कार्यालयातील गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे घेऊन पळ काढल्याने खळबळ उडाली. अधिकाऱ्यांना याबाबत समजताच त्यांनी सगळीकडे शोध घेतला. मात्र जैन सापडला नाही. अखेर, राकेश रंजन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्याचा शोध सुरू केला आहे.