२५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुजरातमधून अटक करण्यात रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलिसांना यश आले आहे. गुजरातमधील आरोपीच्या गावाबाहेर पोलीस पथकाने दोन दिवस मुक्काम ठोकून मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. बनावट धनादेशाच्या साह्याने १९९८ मध्ये कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्नात त्याचा सहभाग असल्यामुळे त्याला त्यावेळी अटक झाली होती. पण न्यायालयापुढे हजर न राहिल्यामुळे त्याला फरार घोषित करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने मुंबईतील तरुणाला आत्महत्येपासून रोखले

अहमद अली पटेल उर्फ अहमदभाई अलीभाई पटेल (६२) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो गुजरातमधील आछोड या गावचा रहिवासी आहे. पटेलने मुख्य सूत्रधार जनक जसवंतलाल ढोलकिया याच्या सांगण्यावरून १९९८ मध्ये बँक ऑफ सौराष्ट्रच्या मालाड शाखेचा बनावट धनादेश तयार केला होता. तो धनादेश खरा दाखवून ५० हजार रुपयांचे कॅमेरे खरेदी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी फोटोक्लिप इंडिया लि.चे के.एस. पिल्ले याच्या तक्रारीवरून आरएके मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पटेलने पिल्ले यांच्या कंपनीत साखळी पद्धतीने दूरध्वनी करून ते पॅरामाउंट केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड येथून बोलत असल्याचे भासवले व ४० कॅमेऱ्यांचे मागणी पत्र स्वतः दिले. त्यासाठी एस.डी. पारेख नावाने बनावट धनादेश दिला होता. याप्रकरणी आरएके मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पटेलला त्यावेळी अटक झाली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. मात्र त्यानंतर न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे त्याला न्यायालयाने फरार घोषित केले होते.

हेही वाचा- नगरसेवक नसताना निधीवाटप कसे?, मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार नुकतीच फरार आरोपींना अटक करण्याची मोहिम मुंबईत पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त (परिमंडळ-४) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे व त्यांच्या पथकाने गुजरातमध्ये जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला पुन्हा अटक केली.

हेही वाचा- ‘गर्लफ्रेंडचा खून करून मृतदेह बेडमध्ये ठेवला अन्…’, नालासोपारा खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

पोलीस पथकाने गावाबाहेरच सापळा रचला होता. पटेलला बँकेचे केवायसी अपडेट करण्यासाठी पॅनकार्ड घेऊन बोलावले होते. पण त्याला संशय आला आणि तो पळाला. अखेर पोलीस पथकाने दोन दिवसांपासून गावाबाहेर थांबून त्याच्या जवळच्या मित्राचा शोध घेतला व त्याच्यासोबत पोलीस पथकाने सापळा रचला. आरोपी तेथे येताच त्याला अटक केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused absconding for 25 years arrested from gujarat after cheating on fake cheque mumbai print news dpj
Show comments