लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : गेल्या १३ वर्षांपासून स्वतःची ओळख बदलून विविध ठिकाणी राहणाऱ्या फरार आरोपीला अटक करण्यात ॲन्टॉप हिल पोलिसांना यश आले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शीव कोळीवाडा येथे सापळा रचून आरोपीला पकडले. त्याच्याविरोधात घरात शिरून हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला.

आरोपी कुप्पन मारीअप्पन देवेंद्र (वय ३६) याच्याविरोधात २०१२ मध्ये भारतीय दंड संहिता कलम ३०७ (खूनाचा प्रयत्न), ४५२ (बळजबरीने घरात घुसणे), ३२४, ३२३ (जखमी करणे), तसेच १४३, १४४, १४६, १४७, १४८,१४९ (बेकायदेशीर जमाव) आणि शस्त्र कायदा ४, २५, तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ (१) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. पण आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून बेपत्ता होता. त्याच्यावर स्थायी वॉरंटही जारी करण्यात आले होते. अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर व अतिरिक्त सत्र न्यायालय क्र. ३० यांनी ॲन्टॉप हिल पोलिसांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलीस उपायुक्त रागसुधा आर. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक अरफात सिध्दीकी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार गोरख सानप, पोलीस हवालदार शिवाजी दहिफळे आणि महिला पोलीस अंमलदार काजल सपकाळ यांनी तपास सुरू केला. प्रथम आरोपीच्या आई व बहिणीकडे चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही महत्त्वाची माहिती मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी परिसरात गुप्तपणे शोधमोहीम सुरू केली. त्याचदरम्यान, आरोपी एका झोपु योजनातील प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

पोलिस पथकाने २० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १२ वाजता कोळीवाडा येथे सापळा रचला. तेथे सर्व्हेक्षण अधिकाऱ्यांमध्ये मिसळून पोलिसांनी बारकाईने निरीक्षण सुरू केले. आरोपीने सर्व्हेक्षणासाठी आधारकार्ड सादर करताच त्याची खातरजमा करण्यात आली. फरार आरोपी असल्याचे निश्चित होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला स्थायी वॉरंटनुसार अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सत्र न्यायालयाने आरोपीला ६ मार्च २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी आपली ओळख लपवून मुंबई बाहेर राहत होता. तो त्याच्या काही कुटुंबियांच्या संपर्कात होता. पण कोणाकडूनही त्याची माहिती मिळत नव्हती. अखेर झोपु योजनेत सर्वेक्षणासाठी तो येणार असल्याची माहिती खबऱ्यांद्वारे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सर्वेक्षण अधिकारी असल्याचे भासवून त्याची ओळख पटवली.