पोलिसांनी कूपर रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेलेल्या आरोपीने हातातील बेडी उघडून पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफिने आरोपीला रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पकडले. यावेळी आरोपीने एका पोलिसाला मारहाण केली असून याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Video: क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अडचणीत; सोशल इन्फ्लुएन्सर सपना गिलनं केली विनयभंगाची तक्रार, गुन्हा दाखल!

तक्रारदार पोलीस हवालदार सुयोग वैद्य (५३) विलेपार्ले पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. विलेपार्ले पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी तौफीक इस्लाम शेख (२९) याला अटक केली होती. वैद्य व त्यांचे सहकारी पोलीस महाले बुधवारी तौफीकला कूपर रुग्णालयात घेऊन गेले होते. आरोपीची मानसिक स्थिती तपासण्यासाठी एक चाचणी करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याची एमआरआय चाचणी करण्यासाठी सांगितले. त्यामुळे महाले एमआरआय विभागात चौकशी करण्यासाठी गेले. त्यावेळी वैद्य व शेख दोघे कूपर रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर होते. शेखने हातातील बेडी टोचत असल्याचे सांगून ती थोडी सैल करून घेतली. त्यानंतर त्याने आपल्याला थंडी वाजत असल्याचे सांगून अंगावर चादर देण्यास सांगितले. अंगावर चादर घेतल्यानंतर आरोपीने हळूहळू बेडीतील हात काढून घेतला व अचानक तो वैद्य यांच्या अंगावर धावून आला.

हेही वाचा >>> मुंबई : रेल्वेला ‘ळ’चे वावडे; रेल्वे स्थानकांच्या हिंदी नावातील ‘ल’च्या जागी ‘ळ’ करण्याकडे दुर्लक्ष

शेखने दिलेल्या धक्क्यामुळे वैद्य खाली कोसळले. त्यानंतर आरोपीने त्यांना मारहाण केली व तेथून पळ काढला. वैद्य यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. तसेच त्यांनी महाले यांनाही घडलेला प्रकार सांगून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर थांबण्यास सांगितले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यानंतर शेखने दगड उचलला व मारण्याची धमकी देऊन लागला. अखेर दोन्ही पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पुन्हा ताब्यात घेतले. याप्रकरणी वैद्य यांच्या तक्रारीवरून जुहू पोलीस ठाण्यात शेखविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शेख सराईत आरोपी असून त्याच्याविरोधात मारामारी, घरफोडी, जबरी चोरी असे १४ गुन्हे दाखल आहेत. तीन वेळा त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused arrested after unsuccessful attempt to escape from mumbai cooper hospital mumbai print news zws