उत्तर प्रदेशमध्ये अटक केलेल्या एका गुन्हेगाराला गोवा पोलीस गोव्याला घेऊन जात होते. मात्र अटक केलेला हा ३२ वर्षीय इसम मुंबई विमानतळावर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला आहे. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र त्याला पकडू शकले नाहीत. गुन्हेगार निसटल्यानंतर पोलिसांनी सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, इमाद वसीम खान याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला गोव्याला आणलं जात होतं. बुधवारी सकाळी ६ वाजता गोवा पोलिसांचं एक पथक इमादला घेऊन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं. मुंबई विमानतळावर असताना तो पोलिसांच्या हातून निसटला. इमादविरोधात गोव्यात काही लोकांना बंदिस्त करणे, मारहाहण करणं, तोतया शासकीय अधिकारी बनून लोकांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोवा पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशात जाऊन इमाद खानला अटक केली होती. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे तो लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन इमादल्या बेड्या ठोकल्या. त्यानंतर दोन पोलीस त्याला विमानाने गोव्याला घेऊन जात होते. मुंबई विमानतळावरून दोन्ही पोलीस आणि इमाद गोव्याला जाणाऱ्या विमानात बसणार होते. मात्र मुंबई विमानतळावर एक पोलीस कर्मचारी विमातळावरील कर्मचाऱ्याशी टी-१ विमानतळाबाबत (देंशातर्गत विमानांची उड्डाणे येथूनच होतात) विचारणा करत होता. त्याचवेळी इमाद खान दुसऱ्या पोलिसाला धक्का देऊन तिथून पळून गेला.

मुंबईतील सहार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार दोन्ही पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र तो विमानतळावरून निसटला आणि एका कारमध्ये बसला. तोवर एक पोलीस त्या कारपर्यंत पोहोचला, पोलिसाने त्याला कारमधून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमध्ये तिथे हाणामारी झाली आणि इमाद कारमध्ये बसून पळून गेला. दोन्ही पोलिसांनी इमादचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. अखेर या पोलिसांनी सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता मुंबई पोलीसही इमादचा तपास करत आहेत.

हे ही वाचा >> मुंबई पदवीधरमध्ये मतदार यादीचा घोळ; १२ हजार नावे समाविष्ट नसल्याचा आरोप

इमादविरोधात भादंवि कलम ३४२, १७०, ३२३, , ५०६, ३८९ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गोव्यात सरकारी अधिकारी असल्याचे सांगून लोकांना धमकावत होता, पैसे उकळत होता. अनेकांना लुबाडून तो उत्तर प्रदेशला पळून गेला. इमाद उत्तर प्रदेशात असल्याची माहिती म्हापसा पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे म्हापसा पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. गोवा पोलिसांनी मंगळवारी त्याला तेथून अटक केली. मात्र बुधवारी तो मुंबई विमानतळावरून फरार झाला. दोन हवालदार त्याला घेऊन येत होते. त्यापैकी एक जण विमातळावरील कर्मचाऱ्यांशी बोलत असताना इमादने हवालदार सुशांत चोपडेकरला ढकललं आणि तिथून पळून गेला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused arrested by goa police uttar pradesh absconded from mumbai airport asc
Show comments