मुंबई : पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणातून सांताक्रुझ येथे गुरुवारी काठी व पेव्हर ब्लॉकने केलेल्या मारहाणीत ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने जयशंकर मिश्रा (४८) याला अटक केली. याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजेशकुमार शुक्ला (३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्ला याचे आरोपीशी पूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून आरोपीने काठी, पेव्हर ब्लॉक व छत्री याने शुक्लाला मारहाण केली. त्यानंतर शुक्लाला तातडीने कुपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरक्षा रक्षक मकरबहादूर सिंह याच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली होती.
हेही वाचा – सरकार जनतेच्या पैशावर परदेश दौऱ्यात मग्न; आदित्य ठाकरे यांचा आरोप
हेही वाचा – मुंबई: गस्तीवरील पोलिसाचा मृत्यू
सांताक्रुझ पश्चिम परिसरातील एस. व्ही. रोडवरील डायग्नोस्टिक सेंटरसमोरील शुक्ला झोपले होते. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता गुन्हे शाखा, कक्ष ९ यांच्या पथकाने याप्रकरणी समांतर तपास सुरू केला. प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व कक्ष ९ चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तपास केला. त्यावेळी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा रेल्वेने किंग्ज सर्कल येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून कक्ष ९ पथकाने किंग्ज सर्कल रेल्वे स्थानाकजवळून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे मान्य केले. आरोपी मिश्रा अॅन्टॉपहिल परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.