वाशी येथील बिल्डर सुनील कुमार लोहारिया यांची तीन महिन्यापूर्वी झालेल्या हत्या प्रकरणातील एक आरोपी सुरेश बिजलानी यांच्यावर शुक्रवारी दुपारी खारघर येथे दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. बिजलानी यात बालंबाल बचावले.  स्वसंरक्षणार्थ त्यांच्या सुरक्षारक्षकाने मारेकऱ्यांवरही गोळीबार केला. हा हल्ला लोहारिया यांच्या मुलाच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप बिजलानी यांनी केला आहे.
सुनील लोहारिया यांची १६ फेब्रुवारीला त्यांच्या वाशी येथील कार्यालयाबाहेर निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यात एक मारेकरी व माजी पोलिस अधिकारी यांचा समावेश होता. लोहारिया यांचा मुलगा संदीप याने या हत्या प्रकरणात वाशीतील बिल्डर सुरेश बिजलानी व वास्तुविशारद अनुराग गर्ग यांचा समावेश असल्याचा आरोप केला होता. पोलिसांनाही काही धागेदोरे सापडले होते. हा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे. तेव्हापासून बिजलानी व गर्ग फरारी आहेत. बिजलानी यांना त्याच्या मूळ गावी मध्य प्रदेश मधील न्यायालयाने आठ दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जामिन मंजूर झाल्याने ते आज आपला मित्र मनिष भतिजा याला भेटायला खारघर येथे जात असताना सेंट्रल पार्क येथील रस्त्यावर त्यांच्या गाडीचा पाठलाग करीत असलेल्या दोन मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडून गोळीबार केला. त्यांनी तीन गोळ्या मारल्या पण बिजलानी यांना गोळी लागली नाही. प्रतिकारासाठी त्यांनी आपल्या परवानाधारक रिव्हाल्वरमधून गोळीबार केला. मारेकरी पनवेलच्या दिशेने पळून गेले. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संदीप लोहारिया यांच्या इशाऱ्यावरून हा गोळीबार करण्यात आल्याची तक्रार बिजलानी यांनी खारघर पोलिस ठाण्यात केली आहे.

Story img Loader