* फिंगर प्रिंट विभागातील संगणक बंद
* शासनाची उदासीनता आणि गुन्हेगारांना फायदा
गुन्हेगारांना शोधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा फिंगर प्रिंट विभागाचा सव्‍‌र्हर गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्व फिंगर प्रिंट विभागातील तज्ज्ञ हाताने काम करीत आहेत. परिणामी अनेक चुका होत असून त्याचा फायदा गुन्हेगारांना होत आहे.
कुठल्याही गुन्ह्य़ाच्या तपासात सर्वात मोठी भूमिका असते ते अंगुली मुद्रा विभाग अर्थात फिंगर प्रिंट्सची. राज्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या (पुणे) अप्पर पोलीस महासंचालकांच्या अखत्यारीत फिंगर प्रिंट विभाग कार्यरत आहे. पुणे, औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर येथे फिंगर प्रिंट्स विभागाचे मुख्य ब्युरो असून ४१ जिल्ह्यांमध्ये केंद्र आहेत. फिंगर प्रिंट्स विभागाचे मुख्यालय पुणे येथे आहे. पुणे येथील मुख्यालयात मुख्य सव्‍‌र्हर असून तो इतर केंद्रांशी जोडला गेला आहे. परंतु गेल्या दीड वर्षांपासून येथील सव्‍‌र्हर बंद असून त्यामुळे सर्व संगणक ठप्प पडले आहेत. (२००७ सालापासून सव्‍‌र्हर बंद असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली. पण अधिकारी केवळ मागील दीड वर्षांपासून सव्‍‌र्हर बंद असल्यचा दावा करीत आहेत) त्यामुळे फिंगर प्रिंट विभागातील तज्ज्ञांना हाताने ठसे तपासावे लागतात. मानवी कार्यपद्धत अचूक कधीच नसते. त्यामुळे चुका होतात आणि त्याचा फायदा गुन्हेगारांना मिळतोय. न्यायालयात फिंगर प्रिंट्सचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. परंतु ते अचूक नसल्याने त्याचा फायदा आरोपींना मिळत असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.
मुंबईला स्वतंत्र संचालक नाही
मुंबई हे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे शहर आहे. मुंबईत फिंगर प्रिंट ब्युरो असला तरी स्वतंत्र संचालक नाही. तांत्रिक बाबीमुळे गेल्या ७ वर्षांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे पुण्याच्या संचालकांकडे मुंबईचा अतिरिक्त कार्यभार सोपवला गेला आहे. त्यांना मुंबई, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण आदी विभाग सांभाळावा लागतो. त्यावरूनच या विभागाकडे शासन किती गंभीरतेने पाहत आहे, हे स्पष्ट होत आहे.
नवीन यंत्रणा अद्याप प्रतीक्षेत
यापूर्वी फिंगर अ‍ॅनालिसिस अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टम कार्यरत होती. २००३ ला ती आणण्यात आली. मे २००४ ला ती सुरू झाली; परंतु नंतर बंद पडली. नवीन सिस्टीम क्राइम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीम आणण्यात येणार आहे. त्याला अजून मुहूर्त मिळालेला नाही.
सध्या सर्वच केंद्रांमध्ये फिंगर प्रिंट तज्ज्ञ हाताने ठसे तपासत असल्याचे पाहायला मिळतं. सराफ जे यंत्र वापरतात (लिनियन टेस्टर) त्याने फिंगर प्रिंट तज्ज्ञ ठसे तपासत असतात. एक तज्ज्ञ दोन तासांपेक्षा जास्त वेळ ठसे तपासू शकत नाही. हे काम अत्यंत नाजूक आणि डोळ्यांना त्रास होणारे असते. त्यामुळे बहुतांश फिंगर प्रिंट तज्ज्ञांना चष्मा लागलेला आहे. फिंगर प्रिंट तपासताना त्या खोलीत नैसर्गिक प्रकाशाची आवश्यकता असते. पण मुंबईसारख्या महत्त्वाच्या केंद्रांत भेट दिल्यावर येथील दुरवस्था दिसून येते.
संगणक नसल्याने काम ठप्प
संगणक नसल्याने काय होत असेल याची कल्पनाचा केलेली बरी. मुळात फिंगर प्रिंट्स तज्ज्ञांची कमतरता. त्यातच त्यांना बढती मिळून ते निघून गेल्यावर रिक्त पदे लवकर भरली जात नाहीत. काम मंदगतीने सुरू असते आणि त्यामुळे कामाचा ढीग वाढत जातो. हजारो िफगर प्रिंट्स अद्याप तपासायचे बाकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कसे चालते काम
एखाद्या गुन्ह्य़ाच्या ठिकाणी उमटलेले ठसे (फिंगर प्रिंट्स) तज्ज्ञांच्या माध्यमातून ठसे घेतले जातात. ते ठसे पडताळणीसाठी फिंगर प्रिंट विभागात पाठवले जातात. त्या ठशांचा रेकॉर्ड मग तपासला जातो. हजारो रेकॉर्डमधून हे ठसे तपासले जातात. अत्यंत बारकाईने ते तपासावे लागतात. जर या ठिकाणी संगणक असता तर तात्काळ काम होऊ शकले असते. परंतु आता हातानेच हे काम करावे लागते, त्यामुळे वेळही जातो आणि अचूकपणाही येत नाही. एखादा गुन्हेगार जर सापडला तर त्याचा पूर्वेतिहास किंवा तो अभिलेखावरील आहे की नाही ते फिंगर प्रिंट्सच्या माध्यमातून स्पष्ट होते. त्यासाठी ठसे स्कॅन करून ठेवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्यापही लाखो ठसे स्कॅन करणे बाकी आहे.
फिंगर प्रिंटसारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या खात्याबाबत शासनाची असलेली उदासीनता यानिमित्ताने दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा