मुंबईः फॉरेक्स ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे शिपिंग कंपनीच्या कॅप्टनची ३७ लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्या प्रकरणी एकाला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. सतीश गुप्ता असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. फसवणुकीच्या एकूण रक्कमेपैकी २७ लाख रुपये गुप्ताच्या बँक खात्यात जमा झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार हे शिपिंग कंपनीत कॅप्टन म्हणून काम करायचे. सप्टेंबर महिन्यात त्यांना मोबाईलवर एक दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्याने त्याची ओळख राहुल शर्मा सांगितली. आमच्या कंपनीद्वारे फॉरेक्समध्ये गुंतवणूक केल्यास ३०० डॉलर बोनस आणि ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत नफा मिळेल असे त्यांना सांगण्यात आले. प्रति दिन ३ ते ८ टक्के नफा मिळेल, असे आमीष आरोपींनी दाखवले.

हेही वाचा… नाकाबंदीसाठी तैनात पोलिसाला दुचाकीस्वाराची धडक

आरोपीने तक्रारदारांना एक फॉरेक्स ट्रेडिंग अ‍ॅप डाऊन लोड करण्यास सांगितले. ते अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर स्वतःच्या बँक खात्यातून २७ लाख ७१ हजार रुपये व पत्नीच्या बँक खात्यातून ९ लाख रुपये अ‍ॅपवर जमा केले. पैसे गुंतवल्यावर अ‍ॅपवर ७० लाख रुपयांचा नफा दिसत होता. त्यामुळे तक्रारदार यांनी ती रक्कम काढण्याचा निर्णय घेतला. पण ती रक्कम काढता येत नव्हती. अखेर तक्रारदाराने राहुलला दूरध्वनी केला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदार याने राहुलला आपण भेटूया का अशी विचारणा केली. त्याने सध्या भेटता येणार नसल्याचे सांगितले. गुंतवलेली रक्कम व नफा मिळत नसल्याने तक्रारदार हे उत्तर प्रदेश येथे गेले. तेथे त्या नावाच्या कंपनीचे कार्यालयच नसल्याचे त्याना सांगण्यात आले.

हेही वाचा… मुंबई सेंट्रलमधील बहुमजली इमारतीला आग

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना दोघांची माहिती मिळाली. त्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत पोलिसांना महत्वपूर्ण माहिती मिळाली. फसवणुकीचे २७ लाख रुपये ज्या खात्यात आले, त्या खात्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सतीशला नुकतेच ताब्यात घेऊन अटक केले. एका व्यक्तीच्या सांगण्यावरून सतीशने बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून कंपनी सुरु केली. त्या कंपनीच्या नावावर संबंधीत बँक खाते उघडण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused has been arrested for 37 lakh cyber fraud through forex trading app mumbai print news dvr