मेफेड्रॉन (एमडी) व कोकेनच्या तस्करीच्या १५ हून अधिक गुन्ह्यांत सहभागी सराईत आरोपीला अटक करण्यात अंमलीपदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे. सचिनम चंग्या गुरुस्वामी ऊर्फ संजय ऊर्फ संजीव शेट्टी (५२) असे या आरोपीचे नाव असून कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणातही तो फरारी होता. वीस वर्षांनंतर त्याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
संजीव हा पूर्वी कुलाबा परिसरात राहात होता. याच परिसरात त्याने स्वत:ची दहशत निर्माण केली होती. तो अंमलीपदार्थ तस्करीत सक्रिय होता. अनेक लहान-मोठ्या तस्करांना तो एमडी आणि कोकेन पुरविण्याचे काम करीत होता. वीस वर्षांपूर्वी त्याने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला होता. याच प्रकरणात त्याच्याविरुद्ध कुलाबा पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. पळून गेलेल्या संजीवाला नंतर या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. वेगवेगळ्या ठिकाणी राहून तो अंमलीपदार्थ पुरविण्याचे काम करीत होता. काही अंमलीपदार्थ तस्कराच्या अटकेनंतर त्याचे नाव उघड झाले होते.
हेही वाचा – बीडीडी चाळीतील पोलिसांना आता १५ लाखांत घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यासह अंमलीपदार्थ विरोधीत पथकाकडे १५ गुन्ह्यांची नोंद आहे. या सर्व गुन्ह्यांत त्याचा शोध सुरू होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. संजीव बोरिवली परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या पथकाने त्याला बोरिवलीमधून अटक केली. त्याची चौकशी केली असता अंमलीपदार्थांच्या विविध गुन्ह्यांसह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तो फरारी आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तो नाव बदलून झोपड्यामध्ये राहत होता. अनेकदा तो रिक्षाने प्रवास करीत होता. एमडी आणि कोकेन विकण्यासाठी तो मोबाइलचा वापर करीत होता. मोबाइलवरूनच त्याचे सर्व काम चालायचे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.