लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : मिरारोड येथील रहिवासी असलेल्या महिलेला धमकावून ४६ लाख रुपयांची खंडणी उकळणारा आरोपी इमरान कालिया कुख्यात दाऊदचा भाऊ मुस्तकीमच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी कालियाची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आरोपीने आणखी व्यक्तींनाही धमकावल्याचा संशय असून याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.

इमरान कालिया हा दाऊदचा भाऊ मुस्तकीमच्या सतत संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीत उघड झाली आहे. कालियाच्या मोबाइलची तपासणी केली असता आरोपी नियमित मुस्तकीमच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. कालियाने मे महिन्यातही मुस्तकीमशी संपर्क साधला होता. कालियाचे वडील हनिफ कुत्ता दाऊदचे विश्वासू होते. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद टोळीचे सर्व गुंड परदेशात पळाले होते. त्यात हनीफ कुत्ताही दुबईला पळाला होता. तेथेच त्याचा मृत्यू झाला. हनीफ कुत्ताला मुत्राशयाचा आजार झाला होता. त्यातच २००० साली त्याचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-सरकारच्या निष्क्रियतेमुळे मुंबईची झोपडपट्टीचे शहर म्हणून ओळख ,‘…अन्यथा धोरणाचे भावी पिढीवर परिणाम’

आरोपी कालिया हा वडील हनिफ कुत्ता व दाऊदचे जुने छायाचित्र दाखवून लोकांना धमकावत होता. त्याने अनेकांकडून पैसेही उकळले आहेत. आरोपींनी अनेकांना धमकावल्याचा संशय असून कालियाने आणखी किती जणांना धमक्या दिल्या आहेत, याचा तपास सुरू आहे.

आरोपी कालियाने २०१९ मध्ये अभियंत्याला मारहाण केली होती. त्याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्याचा भाऊ नबीलही आरोपी होता. याशिवाय कालियाविरोधात आणखी गुन्हे दाखल आहेत. आरोपी दक्षिण मुंबईत अनधिकृत बांधकामात सक्रिय होता. त्यामुळे एमपीआयडी कायद्याअंतर्गतही त्याच्याविरोधात काही गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनेक बांधकामाच्या प्रकल्पांवरून आरोपीने अनेकांना धमकावले होते. त्याबाबतही गुन्हे शाखा तपास करीत आहे.

आणखी वाचा-आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार? बाळा नांदगावकरांचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही…”

इम्रानला अटक कशी झाली?

मीरा रोड येथील रहिवासी असलेली ४६ वर्षीय महिला दुबईत मार्केटिंग कर्मचारी म्हणून काम करीत होती. इम्रानने महिलेसोबत काही छायाचित्रे काढली होती आणि ती व्हायरल करण्याची धमकी देऊन तो महिलेला तिची मिरारोडमधील सदनिका विकून पैसे देण्याची मागणी करीत होता. मुंबईत परतल्यावर इम्रान कालियाच्या तगाद्याला कंटाळून तिने गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बुधवारी कालियाला न्यायालया पुढे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.