पंधरा वर्षांच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षभरापासून अटकेत असलेल्या २२ वर्षांच्या तरुणाला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. पीडित मुलगी आणि आरोपी दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि पीडित मुलगी अल्पवयीन असली तरी तिला त्या दोघांनी केलेल्या कृतीच्या परिणामांची जाणीव होती, असे सकृतदर्शनी मत न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर करताना नमूद केले.
आरोपीने पीडित मुलीला नातेवाईकाच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मात्र, पीडित मुलगी आरोपीसोबत स्वेच्छेने त्याच्या नातेवाईकाच्या घरी गेली होती. तसेच दोघांमध्ये जे काही झाले त्या कृतीच्या परिणामांची तिला जाणीव होती. पीडित मुलगी अल्पवयीन असली आणि कायद्याचा विचार करता लैंगिक संबंधांना तिने दिलेली परवानगी ग्राह्य मानता येणार नसली तरी आरोपीवर प्रेम असल्याची आणि लैंगिंक संबंध तिच्या संमतीनेच झाले होते, अशी पीडित मुलीने कबूल केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लैंगिक संबंधांना तिने दिलेल्या परवानगीचा मुद्दा हा पुराव्याचा भाग ठरतो, असेही न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने आरोपीला दिलासा देताना नमूद केले.
पीडित मुलीने लैंगिक कृत्याला प्रतिकार केला की नाही आणि आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी बळजबरीने कोणत्या वेळी लैंगिक संबंध ठेवले हे खटल्याच्या वेळीच ठरवावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले. आरोपीही तरूण आहे. त्यामुळे त्यालाही मोह आवरता आला नसल्याची बाब नाकारता येणार नाही. शिवाय एप्रिल २०२१ पासून आरोपी कारागृहात असून त्याला आणखी कारागृहात ठेवण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर करताना नमूद केले.
हेही वाचा- मुंबईत गोवरचा १२ वा मृत्यू; गोवरचे १३ नवे तर १५६ संशयित रुग्ण आढळले
तक्रारीनुसार, आरोपीने ६ एप्रिल २०२१ रोजी पीडित मुलीला त्याच्या नातेवाईकाच्या घरी नेऊन तिथे तिच्यावर बलात्कार केला. आरोपीशी व्हॉट्स ॲपवरून बोलत असल्याचे कुटुंबीयाना आढळल्यावर पीडित मुलीने आरोपीसोबत केलेल्या कृतीबाबत बहिणीला सांगितले. तक्रार दाखल करण्यात झालेल्या विलंबाची आणि आरोपीसोबत व्हॉट्स ॲपवरून बोलताना पकडले जाईपर्यंत पीडित मुलीने घटनेबाबत काहीच वाच्यता केली नसल्याची न्यायालयाने आरोपीला दिलासा देताना नोंद घेतली.