मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटींच्या अपहार प्रकरणातील दोन आरोपी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू भोअन व अपहारातील १५ कोटी रुपये स्वीकारणारा मनोहर उन्ननाथन याला मंगळवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. आर्थिक गुन्हे शाखा आरोपींच्या कोठडीची मागणी करणार आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बँकेच्या संचालकांकडून बँकेच्या व्यवहारांबाबतची माहिती घेतली. यावेळी त्यांनी आपल्याला अपहाराबाबतची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच त्यातील बहुतांश जणांनी महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि माजी अध्यक्ष हिरेन भानू यांनी हा अपहार केल्याचा दावा केला. तसेच आर्थिक गुन्हे शाखेने महाव्यवस्थापक हितेश मेहताच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे.

बँकेचे संचालक फ्रेडरिक डिसा, कुरुश पगडीवाला, मिलन कोठारी, शिव कथुरिया, वीरेन बारोट आणि विनीत उपाध्याय या सहा संचालकांकडून आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या व्यवहारांची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी तपासात सहकार्य केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हितेश मेहता आणि हिरेन भानू हे बँकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये लेखा परीक्षण अहवाल दाखवायचे आणि सर्व काही सुरळीत असल्याचे सांगत होते. त्यामुळे त्यांना कोणत्याही गैरव्यवहाराची माहिती नव्हती, असा त्यांनी दावा केला. आर्थिक गुन्हे शाखेने रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवून याप्रकरणात कोणत्या मुद्द्यांमुळे बँकेचे परीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबत माहिती मागवली आहे. तसेच आरबीआयने २०१९ ते २०२५ दरम्यान बँकेचे कोणते अहवाल तपासले होते, याबाबतही माहिती मागवण्यात आली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, बँकेचे सीईओ अभिमन्यू भोअन, मनोहर उन्ननाथन यांचा समावेश आहे. त्यातील भोअन व मनोहर दोघे आर्थिक गुन्हे शाखेच्या कोठडीत असून त्यांची कोठडी मंगळवारी संपत असल्यामुळे त्यांना न्यायालयापुढे दुपारी हजर करण्यात येणार आहे. त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात येणर आहे. याशिवाय याप्रकरणात हिरेन भानू, गौरी भानू, उन्ननाथन अरूणाचलमसह आणखी एका व्यक्तीला आरोपी करण्यात आले आहे. या चौघांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. भानू दाम्पत्याने अपहारातील सुमारे २८ कोटी प्राप्त केल्याचा संशय आहे आणि ते विदेशात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी महाव्यवस्थापक हितेश मेहताच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. तपासाअंती त्यांच्यावर टाच आणण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

Story img Loader