मुंबई : चर्नी रोड परिसरातून जाणाऱ्या ६१ वर्षीय पादचारी महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळालेल्या आरोपीला पाच तासांत अटक करण्यात डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग (डी. बी. मार्ग) पोलिसांना यश आले. आरिफ झाकीर शेख (२०) असे या अटक आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी सराईत असून त्याच्याविरोधात यापूर्वीही जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. इतर गुन्ह्यांतील त्याच्या सहभागाबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तक्रारदार पुरबी भार्गव वैद्य (६१) दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात वास्तव्याला आहेत. शुक्रवार, १४ मार्च रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास त्या गिरगावातील मामा परमानंद मार्ग येथून चर्नी रोडच्या दिशेने जात होत्या. यावेळी एका अज्ञात चोराने त्यांच्या हातातील पर्स हिसकावली. त्यावेळी त्यांनी आरोपीला विरोध केला. पण त्याने तेथून पळ काढला. चोरीला गेलेल्या पर्समध्ये रोख १५ हजार रुपये, बँकेची चार डेबिटकार्डे, एक क्रेडिट कार्ड, आधारकार्ड आणि पॅनकार्ड अशी महत्त्वाचे कागदपत्रे होती. वैद्य यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याप्रकरणी डीबी मार्ग पोलिसांकडे तक्रार केली.

तपासासाठी विशेष पथक स्थापन

महिलेने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख व पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गायकवाड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास तुपे, प्रशांत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गौरव तंवर, विवेक वणवे, पोलीस हवालदार संदीप तळेकर, पोलीस शिपाई मयुर पालवणकर यांच विशेष पथक स्थापन केले.

गुन्ह्याची कबुली

या पथकाने परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यावेळी आरोपी पळालेल्या मार्गाची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खऱ्यांमार्फत शोध घेतला असता आरोपीची माहिती मिळाली. त्या माहितीच्या व तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी संशयीताला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता त्याने महिलेची पर्स चोरल्याचे कबुल केले.

आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत

आरोपीकडून रोख १५ हजार रुपये, डेबिटकार्ड, क्रेडिटकार्ड असा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. महिलेनेही आरोपीला ओळखले असून आरोपी सराईत चोर असल्याची माहिती पोलिसानी दिली. त्याने मरीन ड्राईव्ह व इतर परिसरातही अशा प्रकारे चोरी केल्याची माहिती मिळाली आहे. त्याआधारे पोलीस आरोपीचा गुन्हेगारी पूर्वइतिहात तपासत आहेत.

आरोपीला १४ दिवस पोलीस कोठडी

आरोपीला याप्रकरणी अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी डी.बी. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.