अनिश पाटील
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला समर्थन करणारे उमेश कोल्हे यांची हत्या करणारा आरोपी शाहरूख पठाण याला पाच कैद्यांनी आर्थररोड तुरुंगात मारहाण केली. त्यामुळे नुपूर शर्मा वक्तव्याचा वाद आता देशातील अतिसंवेदनशील अशा आर्थर रोड तुरुंगापर्यंत पोहोचला आहे.
शाहरूख पठाण व इतर कैदी आर्थर रोड तुरुंगात बोलत होते. त्यावेळी कोणाला कोणत्या कारणावरून अटक झाली याबाबत त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हे यांची हत्या केल्याप्रकरणी अटक झाल्याचे पठाणने सांगितले. त्यावेळी कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रावण चव्हाण ऊर्फ आवन व संदीप जाधव या आरोपींनी पठाणवर हल्ला केला.
मुंबई मध्यवर्ती कारागृह (आर्थर रोड) येथील सर्कल क्रमांक ११ मधील बराक क्रमांक दोनमध्ये हा वाद झाला. याबाबतची माहिती तुरुंग सुरक्षा रक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पठाणला इतर आरोपींपासून वेगळे केले. पठाणच्या हाताला व गळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर कारागृह रुग्णालयातच उपचार करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने पठाणवर हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात स्थानिक ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. तुरुंग अधिकारी अमोल चौरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३ अंतर्गत तुरुंगाची शांतता भंग करणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. २३ जुलैला ही घटना घडली असून याप्रकरणी मंगळवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमरावतीचे व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार इरफान खान याचाही समावेश आहे. आरोपी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) या सर्व आरोपींना पुढील तपासासाठी एनआयएने ताब्यात घेतले होते.