मुंबई : कौटुंबिक वादातून पत्नीच्या तोंडात टॉवेल कोंबून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. रेखा खातून ऊर्फ राबीया शेख (२३) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी तिचा पती रॉयल शेखविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नीची हत्या करून रॉयल पळून गेला होता. तंत्रज्ञानाच्या मदतीने पाठलाग करून पोलिसांनी त्याला शोधून काढले. आरोपीला रविवारी रात्री उशीरा अटक करण्यात आल्याची माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली.

रेखा पती रॉयल शेखसोबत गोरेगावमधील तबेला चाळीत राहत होती. ते दोघेही मूळचे कोलकाताचे रहिवाशी आहे. वर्षभरापूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मूळगावी उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे अखेर त्यांनी सहा महिन्यांपूर्वी मुंबई गाठली होती. रॉयलने गोरेगाव येथील राम मंदिर परिसरातील तबेला चाळीत भाडेतत्त्वावर खोली घेतली होती. पती-पत्नी दोघेही मजुरीचे काम करीत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत भांडणे होत होती, अशी माहिती शेजाऱ्यांकडून देण्यात आली.

वाद विकोपाला गेला आणि…

यापूर्वीही रॉयले रेखाला अनेक वेळा मारहाणही केली होती. रविवारी रात्री रेखा आणि रॉय यांच्यात पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. उभयतांमधील वाद विकोपाला गेला आणि रॉयलने रेखाला बेदम मारहाण केली. ती आरडाओरडा करू लागल्यानंतर त्याने रेखाच्या तोंडात टॉवेल कोंबला आणि तिला मारहाण केली. त्यानंतर तिचा गळाही आवळला. ती बेशुद्ध पडल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. पळताना त्याने घराला बाहेरून कडी लावली.

परिचित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

काही वेळ बाहेर फेरफटका मारल्यानंतर त्याने रेखाची परिचित असलेल्या राखी शेख (३५) यांना दूरध्वनी केला होता. यावेळी त्याने तिला घडलेला प्रकार सांगितला. तसेच आपल्याकडून रेखाची हत्या झाल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे राखी रेखा पाहण्यासाठी तिच्या घरी गेली होती. यावेळी रेखा जमिनीवर पडली होती. तिला तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी राखी शेखने गोरेगाव पोलिसांकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. रॉयल रेखाची हत्या करून पळून गेला होता. त्याच्या शोध घेण्यासाठी गोरेगाव पोलिसांनी पथक तयार केले. अखेर पोलिसांनी आरोपीला शोधून काढले आणि रविवारी रात्री अटक केली. आरोपीने हत्येसाठी वापरलेल्या टॉवेलचा पोलीस शोध घेत असून न्यायवैद्यक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले आहेत. गोरेगाव पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत असून आरोपीला सोमवारी न्यायालायपुढे हजर करण्यात आले.

Story img Loader