साकीनाका येथील बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने सर्व आरोपांमध्ये त्याला दोषी ठरवलं आहे. मुंबईतील या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. बलात्कारानंतर महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. दरम्यान आरोपी मोहन चौहानच्या शिक्षेवर १ जूनपासून युक्तिवाद होणार आहे.
मुंबईतील धक्कादायक घटना; बलात्कार करुन गुप्तांगात घुसवला रॉड
Mumbai Rape: साकीनाकामधील बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू
साकीनाका परिसरात झालेल्या संतापजनक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करत आरोपपत्र दाखल केलं होतं. या घटनेत एकच आरोपी आहे. पोलिसांनी ७७ साक्षीदारांचे जबाब नोंद करुन ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केलं होतं.
नेमकं काय घडलं होतं?
खैरानी रोड साकीनाका येथे एक पुठ्ठ्याची कंपनी आहे. १० सप्टेंबर २०२१ च्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान त्या कंपनीच्या सुरक्षारक्षकाने कंट्रोल रुमला फोन करून एका बाईला मारहाण सुरु असल्याचं कळवलं होतं. माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवलं होतं. संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले होते. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली होती. त्यावेळी पोलिसांनी महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी वॉचमनकडून घेऊन टेम्पो चालवत तिला राजावाडी रुग्णालयात नेलं होतं. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले होते. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबरला मृत्यू झाला होता. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपी मोहन चौहानला अटक केली होती.