तुरुंगात कैद्यांना मोबाइल वापरण्यास बंदी असतानाही पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी व छोटा राजनचा साथीदार सतीश काल्या याने तुरुंगातूनच हल्लेखोरांशी संपर्क साधल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या आरोपपत्रातूनच ही बाब स्पष्ट झाली आहे.
ओशिवरा येथे हॉटेलमालकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.
हॉटेलमालक बी. आर. शेट्टी यांच्यावर ओशिवरा येथे गोळीबार करण्यात आला होता. त्यात ते बचावले होते. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतीश काल्यासह पाचजणांना अटक केली. शेट्टी यांच्यावरील हल्ल्याचा कट छोटा राजनच्या सांगण्यावरून झाला होता आणि काल्याने तुरुंगात असताना तो आखल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींनीच पोलिसांना ही माहिती दिली आहे. डे हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी काल्याला सत्र न्यायालयात आणले जात होते. त्यावेळी या हल्लेखोरांनी प्रत्यक्ष भेट घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे.
त्याचवेळी काल्याला मोबाईल फोन पुरविण्यात आला असावा, असेही आता बोलले जात आहे. कुलाबा पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाने मिळालेल्या माहितीवरून काही महिन्यांपूर्वी केलेल्या संयुक्त कारवाईत काही आरोपींच्या चपलेतून मोबाइल फोनच्या बॅटऱ्या हस्तगत केल्या होत्या.
काल्याने ज्या फोनचा वापर केला होता तो त्याने नंतर तुरुंगातच मोडून फेकून दिला असावा, असा संशयही तपास अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

Story img Loader