शाहूनगर पोलीस ठाण्याच्या शौचालयातून शनिवारी रात्री एका आरोपीने पलायन केले. मेहमूद शेख नन्हे खान (२०) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने शौचालयातील एक्झॉस पंख्याच्या जागेतून उडी टाकून पळ काढला.
मेहमूद खान याला शाहूनगर पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात १० ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्याला सोमवापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास शौचालयाला जायचे असल्याचे मेहमूदने सांगितले. बंदोबस्तावरील पोलिसाने त्याला कोठडीतून बाहेर काढून शौचालयात नेले. अर्धा तास वाट बघूनही मेहमूद बाहेर न आल्याने पोलिसांनी दरवाजा ठोठावला. अखेर शौचालयाचा दरवाजा तोडल्यानंतर मेहमूद पळून गेल्याचे समजले. शौचालयातील एक्झॉस पंखा काढून त्या मोकळ्या जागेतून त्याने पळ काढल्याचे पोलीस निरीक्षक बाबाजी आव्हाड यांनी सांगितले. मेहमूदला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.