मुंबई : मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दूरध्वनी बुधवारी पहाटे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. या दूरध्वनीनंतर सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. तसेच दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. आरोपीने दारूच्या नशेत हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात पुढील कारावाई करण्यात येत आहे.

धमकीचा दूरध्वनी

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात बुधवारी पहाटे दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुंबई बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. याशिवाय मुंबईतील संवेदनशील ठिकाणी तैनात सुरक्षा रक्षकांना सतर्क करण्यात आले.

दारूच्या नशेत धमकी

दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. दूरध्वनी करणारी व्यक्ती बोरिवलीमधील रहिवासी असून त्यांचे नाव सूरज जाधव (३७) आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पुढील कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आरोपीने दारूच्या नशेत दूरध्वनी करून धमकी दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

यापूर्वीही तीन गुन्हे

यापूर्वीही आरोपीने तीन वेळा अशा प्रकारे धमकी दिली होती. त्याप्रकरणी बोरिवली, बीकेसी व वाकोला पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.