हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर पलायन केलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशात अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. जुबेर बशीर अहमद इद्रीस (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सत्र न्यायालयाने २०१७ मध्ये हत्येच्या गुन्ह्यामध्ये इद्रीसला जन्मठेप व ५७ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. तो २०२० मध्ये येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला २० जून, २०२० रोजी पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्याने ४ ऑगस्ट, २०२० पर्यंत कारागृहात परतणे अपेक्षित होते. पण तो कारागृहात हजर न होता फरार झाला.
हेही वाचा >>> महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना आता कर्जत, पनवेल, रोहा, लोणावळ्यात थांबा
येरवडा मध्यवर्ती कारागृह पोलीसांनी ४ ऑगस्ट रोजी त्याच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भा.द.वि. कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या शिक्षाबंदी आरोपीतास जन्मठेपेची शिक्षा झालेली असताना तो फरार झाल्याने गुन्हे शाखाही याप्रकरणी समांतर तपास करीत होती. गुन्हे शाखेच्या कक्ष-५ च्या पोलिसांनी याप्रकरणी कसून शोध घेतला असता आरोपी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.