लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : सुमारे पावणेसहा लाख रुपयांचे विदेशी चलन घेऊन पळून गेलेल्या बिनांग व्यास (३२) याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. रोख रक्कम आणून देण्याच्या नावाखाली आरोपी अमेरिकन डॉलर्स घेऊन पळून गेला होता. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
तक्रारदार किशोर कोलचंद भंडारी हे गोरेगाव परिसरात त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिल, पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. गोरेगाव येथे त्यांच्या मालकीचे अरिहंत नावाचे एक सराफाचे दुकान आहे. २३ मेला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्याचे नाव करण पटेल असल्याचे सांगितले. त्याला तातडीने अमेरिकन डॉलरची गरज असून त्यांना डॉलर घेऊन त्यांना बोरिवली येथे येण्याची विनंती केली होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचा कर्मचारी उत्सवकुमार लिंबाच्या याला करण पटेलने दिलेल्या बोरिवलीतील शिंपोली रोड, गौतमनगरच्या सत्र पार्क अपार्टमेंटमध्ये पाठविले होते.
आणखी वाचा-स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास स्थगिती द्या, आमदार रईस शेख यांची बेस्ट प्रशासनाकडे मागणी
उत्सवकुमार हा तिथे गेल्यानंतर त्याला करण पटेल भेटला, त्याने त्याच्याकडून ६८०० अमेरिकन डॉलर घेतले. रोख आणून देतो असे सांगून त्याने त्याला थांबण्यास सांगितले. मात्र बराच वेळ होऊन तो तिथे पावणेसहा लाखांची रोख घेऊन आला नाही. त्यामुळे त्याने सोसायटीच्या रहिवाशांकडे करण पटेलविषयी विचारणा केली. यावेळी त्यांनी तिथे करण पटेल नावाचा कोणीही व्यक्ती राहत नसल्याचे सांगितले. अखेर सीसीटीव्ही तपासणीत व्यासचा याप्रकरणात सहभाग आढळला. त्यानुसारा त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली.