लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनस येथील तिकीट आरक्षण कार्यालयाजवळ झोपलेल्या एका प्रवाशाचा मोबाइल चोरणाऱ्या आरोपीला गुरुवारी आरपीएफच्या जवानांनी रंगेहात पकडले. कुर्ला रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून श्रीनाथ निषाद (२५) उत्तर प्रदेश येथील आपल्या मूळ गावी जात होता. गाडी येण्यास वेळ असल्याने तो टर्मिनवरील तिकीट आरक्षण कार्यालयाजवळ झोपला होता. याचाच फायदा घेऊन एका चोराने त्याच्या खिशातील मोबाइल लंपास केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी तेथे गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याजवळ चोरलेला मोबाइल सापडला. त्यानंतर या आरोपीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हेही वाचा… मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मतीन अन्सारी (२२) असे या आरोपीचे नाव असून कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याने अशाच प्रकारे अनेकांचे मोबाइल चोरल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.