कवितांचा आनंद कसा घ्यायचा हे आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राला शिकविले. त्यांनी संपादित केलेल्या नवयुग वाचनमाला आणि अरुणोदय वाचनमालेमुळे शाळकरी वयापासूनच अनेकांवर साहित्यसंस्कार झाले. ही पुस्तके म्हणजे अत्रे यांनी संपादनात केलेली आमूलाग्र क्रांती होती, असे उद्गार कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी मंगळवारी ‘आचार्य अत्रे सन्मानचिन्ह’ स्वीकारताना काढले.
‘आचार्य प्रल्हाद केशव अत्रे’ या नावाचे गारुड जनमानसावर आजही किती मोठय़ा प्रमाणावर आहे, त्याचा प्रत्यय या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात उपस्थितांना ‘याची देही याची डोळा’ अनुभवायला मिळाला. अत्रेय संस्था आणि अत्रे कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या या  सोहळ्यात ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पाडगावकर यांना हा पुरस्कार देण्यात आला. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
पाडगावकर म्हणाले की, आजवर मला अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळाले. पण त्यापेक्षा आजचा पुरस्कार अनेक पटीने मोलाचा आहे, कारण त्याला आचार्य अत्रे यांच्या नावाचा स्पर्श झाला आहे. आज कवी-लेखक म्हणून मला जे काही स्थान मिळाले आहे, त्याचे सर्व श्रेय आचार्य अत्रे यांनाच आहे. त्यांनी माझ्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आणि खूप मोठा कवी हो, हा दिलेला आशीर्वाद मी कदापिही विसरू शकणार नाही, असे सांगून पाडगावकर यांनी अत्रे यांच्या ‘समीक्षक’ मासिकात प्रसिद्ध झालेली आपली पहिली कविता, अत्रे यांची झालेली प्रत्यक्ष भेट या आठवणींना उजळा दिला.
मधुकर भावे म्हणाले की, अत्रे यांची वाणी आणि लेखणी यामुळेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळाला, हे कधीही विसरून चालणार नाही. वेगवेगळ्या चाळीस विषयांमध्ये अत्रे यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले.
हृदयनाथ मंगेशकर यांनीही उत्तुंग व्यक्तिमत्त्व अशा शब्दांत अत्रे यांचा गौरव करून अल्प वेळात आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी आचार्य अत्रे लिखित ‘विनोद गाथा’ (आवृत्ती सहावी, परचुरे प्रकाशन), शिरीष पै लिखित ‘थोडे हायकू’ (डिम्पल प्रकाशन) आणि अनिल दाभाडे लिखित ‘विनोद गांभीर्य’ या पुस्तकांचे प्रकाशन मंगेशकर यांच्या हस्ते झाले. आचार्य अत्रे यांचे नातू आणि शिरीष पै यांचे पुत्र अ‍ॅड. राजेंद्र पै यांनी प्रास्ताविक केले तर ज्योती आंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास अत्रेप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सभागृहातील व्यासपीठासमोरील मोकळ्या जागेत रसिक उभे होतेच पण आसनांच्या मधील मोकळ्या जागेत काही जण बसले तर अनेकांनी पूर्णवेळ उभे राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

Story img Loader