कुलाबा ते सीप्झ या ३३.५ किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ‘मुंबई मेट्रो रेल कापरेरेशन’ने ‘एकॉम आशिया’ या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
‘मुंबई मेट्रो रेल कापरेरेशन’च्या (एमएमआरसीएल) संचालक मंडळाची बैठक शनिवारी पार पडली. यात कुलाबा-सीप्झ मेट्रो प्रकल्पासाठी ‘एकॉम आशिया’ या कंपनीच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही हाँगकाँगमधील कंपनी असून यात जपानची पडेको, अमेरिकेची एलबीजी इन्क आणि फ्रान्सच्या एजिस रेल या कंपन्यांचा सहभाग आहे.मेट्रो प्रकल्पाचे काम जलदगतीने होण्यासाठी ही सल्लागार कंपनी प्रकल्पाचा आराखडा, देखभाल, दर्जा नियंत्रण, सुरक्षा आणि कंत्राटदार व्यवस्थापनाच्या कामात ‘एमएमआरसीएल’ला मदत करेल. त्यामुळे बांधकाम कंत्राटाच्या निविदांच्या छाननीपासून ते मेट्रो रेल्वे सुरू करण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांत ‘एकॉम आशिया’ सक्रिय असणार आहे.