मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदल अधिकारी विनय नरवाल (२६) यांचा मृत्यू झाला. नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला दुजोरा दिला. नरवाल सध्या दक्षिण नौदल कमांड येथील कोचीमध्ये कार्यरत होते. हरियाणामधील कर्नाल येथील मूळचे रहिवासी असलेले नरवाल हसतमुख व मनमिळावू होते, असे त्यांच्या मित्राने सांगितले.

१६ एप्रिल रोजी रिसेप्शन झाले होते

लेफ्टनंट विनय नरवाल व त्यांची पत्नी हिमानी जम्मू-काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन १६ एप्रिल रोजी झाले. त्यानंतर हे दाम्पत्य चार दिवसांसाठी जम्मू-काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. विनय नरवाल दोन वर्षांपूर्वी नौदलात भर्ती झाले होते. ते कोची येथे कार्यरत होते. त्यांच्या छाती, गळा व पाठीवर गोळ्यांच्या जखमा आहेत. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबिय जम्मू – काश्मीरला रवाना झाल्याचे त्यांच्या मुंबईतील परिचित व्यक्तीने सांगितले. नेहमी हसतमुख चेहरा असलेले नरवाल त्यांच्या सहकाऱ्यांशी आदराने वागायचे, असे त्यांच्यासमवेत काम केलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई पोलीस सतर्क

पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सर्व पोलिसांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आलेले आहे.

मुंबईतील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व स्थानिक उपायुक्तांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी सांगितले. गर्दीची ठिकाणे, संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना सर्व पोलिसांना करण्यात आल्या आहेत. सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीच्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क साहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वीच मुंबईत ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावर बंदी घातली आहे. तसेच सागरी पोलिसांना किनारी परिसरातील गस्तीत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यासाठी अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.