मराठी रंगभूमीला नवे परिमाण देणाऱ्या आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, चित्रपट व रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते व अभिनेत्री घडविणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजयाबाई मेहता यांची अभिनय शाळा मंगळवारी पुन्हा एकदा पु. ल. देशपांडे कला अकादमीत भरली होती. या कार्यशाळेत त्यांचे विद्यार्थी अभिनेत्री अमृता सुभाष, अर्चना केळकर-देशमुख, अभिनेता-दिग्दर्शक संदेश कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती.
पंचम निषादतर्फे येत्या २ ते ६ मे या कालावधीत ‘मॅजिक मोमेंट्स-सर्च बाय अ परफॉर्मर अॅन एन्काऊंटर वुईथ डॉ. विजया मेहता’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवीस कलाकार आणि पाच दिग्दर्शक कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. कला कारकीर्दीच्या मध्यावर असलेल्या कलाकारांसाठी ही कार्यशाळा आहे. कार्यशाळेत स्वत: विजयाबाई मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पत्रकार परिषदेसाठी विजयाबाई सभागृहात आल्या तेव्हा अमृता सुभाष व नीना कुलकर्णी यांनी त्यांची गळाभेट घेतली. हा क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकार सरसावले तेव्हा विजयाबाईंनी ‘या माझ्या मुली आहेत,’ असे म्हणून त्यांना मायेने जवळ घेतले. नीना व अमृता या दोघींनी ‘बाई तुम्ही या वयातही किती सुंदर दिसता,’ असे म्हटले तेव्हा त्यांनी ठेवणीतील हास्याने त्याला जणू काही ‘हो’असे म्हणत उत्तर दिले. पत्रकार परिषदेची दिलेली वेळ उलटून गेली तरी पत्रकार परिषद सुरू होत नव्हती तेव्हा, ‘ए चला गं, आपण आपण आता सुरुवात करू या,’ असे विजया बाईंनी सांगितले आणि वातावरणातील अनौपचारिकता गळून पडली.
वीस ते पंचवीस मिनिटांच्या मनोगतात विजयाबाईंनी आजवरच्या नाटय़ानुभवाचे आणि नाटय़कलेचे सार ओघवत्या शैलीत उलगडले. बाईंचे विद्यार्थीही तल्लीन होऊन ऐकत होते. अलीकडची नाटके फारशी पाहिलेली नाहीत. आजची परिस्थिती बदलली असून आत्ता काम करणारी पिढी ही माझ्या नातवंडांच्या वयाची आहे. ते लक्षात घेऊन मी जमेल तशी व जमेल तेव्हा मदत करत असते असे सुरुवातीलाच सांगून नानासाहेब फाटक यांच्या बरोबर १८ वर्षांची असताना केलेले नाटक, त्यात साकारलेली ‘कमळजा’ही भूमिका, अल्काझी यांच्याकडे घेतलेले नाटय़ प्रशिक्षण, पीटर ब्रुक यांची भेट आदी आठवणींना उजाळा दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा