नाशिक बस दुर्घटनेनंतर जाग्या झालेल्या परिवहन विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी प्रवासी बस वाहतुकदारांवर कारवाईसाठी ९ ऑक्टोबरपासून विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत १ हजार १८१ बसमध्ये वाहतूक नियमांचे पालनच होत नसल्याचे आढळले आहे. यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, धोकादायकरित्या प्रवाशांची वाहतूक करणे असे प्रकार सर्रास होत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा- अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना आणखी ७५५ कोटींची मदत
खासगी प्रवासी आराम बस आणि डंपर यांची धडक झाल्यानंतर बसला लागलेल्या भीषण आगीत प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच नाशिक येथे घडली होती. दुर्घटनाग्रस्त बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत होती. त्यानंतर शासनाच्या आणि विशेषत: परिवहन विभागाच्या भूमिकेवर टीका झाल्यानंतर राज्यात खासगी प्रवासी बस वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ९ ऑक्टोबरपासून राज्यात कारवाईला सुरुवात झाली असून ४ हजार ५६० बसची तपासणी करण्यात आली. यापैकी १ हजार १८१ बसमध्ये वाहतूक नियमांचे पालन झाले नसल्याचे निदर्शनास आले. दोषी आढळलेल्या या बसपैकी १३९ बस विनापरवाना तसेच परवानाच्या अटींचा भंग करुन चालवल्या जात होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ४८ बसवरही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ४९१ बसवर अग्निशमन यंत्रणाच नसल्याने कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय आपत्कालिन निर्गमन आणि दरवाजे कार्यरत स्थितीत नसणाऱ्या बसची संख्या १५१ आहे. एकूण कारवाईतून सात लाखांहून अधिक दंड वसूल झाला आहे. ही कारवाई २३ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
हेही वाचा- दिवाळीत एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ ; एसटीच्या १,५०० जादा गाड्या सोडणार
खासगी प्रवासी बसवर झालेली अन्य कारवाई
योग्यता प्रमाणपत्र नसताना वाहन चालविणे – ७५ बस
रिफ्लेक्टर, इंडिकेटर टेल, दिवे इत्यादी नसणे – २५६ बस
वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरबदल – १७ बस
मोटर वाहन कर न भरणे – ७६ बस
जादा भाडे आकारणी – ३ बस
अवैधरित्या मालवाहतूक – ४० बस
अवैधरित्या टप्पा वाहतूक – २० बस