मुंबई : मुंबई पोलिसांनी ३, ४ मेदरम्यान शहर आणि उपनगरांमध्ये ऑल आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान, १११ ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदीतून ६,२३३ वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या २,४४० वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली.
ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात ७७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.या कारवाईदरम्यान फरार असलेल्या आठ आरोपीतांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. एकूण ५३ अजामीनपात्र वॉरंट काढून आरोपींवर कारवाई करण्यात आली. तसेच, अंमली पदार्थांची खरेदी – विक्री करणाऱ्या इसमांविरोधात ५ कारवाया करण्यात आल्या. त्याचबरोबर अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ४९ कारवाया करून तलवार, चाकू आदी शस्त्रे जप्त करण्यात आली.
अवैध दारू विक्री, जुगार चालविणाऱ्या २४ ठिकाणी छापे टाकून अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यात आले. यातून ३० आरोपीतांना अटक करण्यात आली. तडीपार, तसेच शहरात विनापरवाना प्रवेश केलेल्या तडीपार आरोपींना अटक करण्याच्या अनुशंगाने ६२ कारवाया करण्यात आल्या. संशयितरित्या वावरणाऱ्या इसमांवर १७५, तर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात १५४ कारवाया करण्यात आल्या. संपूर्ण शहरात राबविलेल्या या मोहिमेत ९६४ आरोपींच्या तपासणीतून २३० आरोपींवर कारवाई करण्यात आली. तसेच, ८०० हॉटेल, लॉज, मुसाफिरखाने आदींची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर, एकूण ५२९ संवेदनशील ठिकाणांचीही तपासणी करण्यात आली.